राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:01 PM2018-06-06T23:01:48+5:302018-06-06T23:02:04+5:30

सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे आणि राज्यात आघाडी होणारच हा विश्वास असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

Congress-NCP alliance will be in the state | राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे आणि राज्यात आघाडी होणारच हा विश्वास असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. पटेल यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट मते मांडली.
सत्तास्थापनेनंतर सुरुवातीची तीन वर्षे महागाई कमी करण्यासाठी भाजपासमोर अतिशय पोषक वातावरण होते. मात्र ते काम करण्यात अपयशी ठरले. वर्तमान राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांनी भाजपाला थांबविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नेमके कोण करेल हे सांगणे कठीण आहे. मात्र शरद पवार हे विरोधी पक्षांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतात, असे पटेल म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात कमी होतील. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा यासारख्या राज्यांत तर विरोधकांनी एकत्र येणे भाजपासमोर अनेक आव्हाने उभे करणारे राहणार आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.
पक्ष आत्मचिंतन करणार
राष्ट्रवादी पक्षाला आत्मचिंतनाची आवश्यकता आहे व पुढील लोकसभा निवडणुकांनंतर ते आम्ही निश्चितपणे करू, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपासून नक्कीच वेगळा झाला मात्र विचारधारा बदलू शकली नाही. जर वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रवादीने अगोदरच सुरुवात केली असती तर वेगळे चित्र राहिले असते, असेदेखील ते म्हणाले. ‘सोशल मीडिया’ची निवडणुकांमध्ये मोठी भूमिका दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्ष यात कुठेतरी मागे पडत असल्याचे वास्तव होते. मात्र आता आम्ही कात टाकत असून विशेष ‘आयटी सेल’ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
सरकारचे आर्थिक धोरणच स्पष्ट नाही
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणावरदेखील प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून दर १५ दिवसाला काही ना काही घोषणा करण्यात येते. मात्र सरकारचे आर्थिक धोरणच स्पष्ट नाही. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने फार मोठी चूक केली. आर्थिक धोरणाकडे सरकारने दुर्लक्षच केले. देशात आता १०० बिलियन डॉलरची निर्यात कमी झाली आहे. सरकारने लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत. मात्र त्यांची पूर्तता होत नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे, असे देखील पटेल यावेळी म्हणाले.
मुखर्जींच्या संघस्थानी जाण्यात गैर काय ?
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जात असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र विरोधी विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यक्रमाला जाण्यात गैर काहीच नाही. भारतीय राजकारण्यांनी ही मानसिकता बदलायला हवी, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

Web Title: Congress-NCP alliance will be in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.