काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेने एकत्र लढावे; उद्धव ठाकरेंच्या मताशी पवार सहमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:42 AM2022-07-16T11:42:01+5:302022-07-16T11:42:32+5:30
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनाही लगावला टोला.
नागपूर : नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनीदेखील या भूमिकेचे समर्थन केले आहे. हे तीनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझंही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे पवार यांनी शुक्रवारी नागपुरात स्पष्ट केले. पण, याबाबत काँग्रेससोबत व शिवसेनेसोबतही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
पवार शुक्रवारी नागपुरात होते. पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संसदेत बोलताना एखाद्या विषयावर सरकारकडे मागणी केली आणि मान्य झाली नाही, तर विरोधक सभात्याग करतात. बाहेर धरणे देतात. आता केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून या अधिकारावर बंदी आणली आहे. हे करताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतले होते का, असा सवालही त्यांनी केला.
गेले १०-१२ दिवस दोन मंत्रीच कामावर
राज्यात पूरपरिस्थिती आहे. प्रशासन ठप्प पडले आहे. फक्त दोनच मंत्री गेल्या १०-१२ दिवसांपासून कामावर आहेत, राज्याची परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असा टोला पवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला.