आरक्षणावरून काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारण करतेय
By Admin | Published: August 30, 2015 02:33 AM2015-08-30T02:33:36+5:302015-08-30T02:33:36+5:30
मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांनी धनगर आरक्षणाला सत्तेत असताना विरोध केला..
राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन : मराठा व धनगर आरक्षणासाठी एल्गार
नागपूर : मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांनी धनगर आरक्षणाला सत्तेत असताना विरोध केला ते आज घोंगडे पांघरून आरक्षणाची मागणी करीत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा व धनगर समाजाचा उपयोग राजकारणासाठी करू पाहत आहेत, असा आरोप करीत त्यापासून सावध रहा, असे आवाहन महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचा १२ वा वर्धापन दिन देशपांडे सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे यांनी मराठा व धनगर समाज आरक्षणाचा आवाज बुलंद केला. जानकर म्हणाले, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते तर धनगर समाज आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष अजित पवार होते. राणेंनी त्यांच्या अहवालात मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी शिफारस केली. मात्र, पवार यांनी त्यांच्या अहवालास धनगरांना आरक्षण देऊ नये, अशी नोट लिहिली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीररीत्या धनगर आरक्षणाला विरोध केला होता. हे सर्व पाहिल्यावर आपण हक्कासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला व धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सत्तेच्या खाली खेचण्याचा निर्धार केला. मी सत्तेसाठी भाजपसोबत नाही तर, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजपसोबत आहे. ज्या दिवशी भाजपही काँग्रेस- राष्ट्रवादीप्रमाणे आरक्षणाचे भिजत घोंगडे ठेवत असल्याचे दिसन येईल त्या दिवशी मी सत्तेसोबत नाही तर समाजासोबत असेल, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महायुतीचे सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. तसा सकारात्मक अहवाल सरकारने तयार केला असून तो केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सांगत वेळ लागेल पण आरक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला.
गुजरातमध्ये आरक्षणासाठी पटेल एकत्र आले. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील मराठ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळवून दाखवावे, आपण त्यांचा जाहीर सत्कार करू, असा चिमटाही त्यांनी काढला.
आ. विनायक मेटे म्हणाले, आर्थिकदृष्ट्या गरीब असलेले कुणबी, मराठा, पाटील मराठा आरक्षणासाठी नेमही एकत्र येतात.
पण सक्षम व सधन असलेले मराठे एकत्र येत नाही. धनगर व मराठा आरक्षण रखडल्याचे पाहून काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते या समाजाचा उपयोग राजकारणासाठी करू पाहत आहेत.
मात्र, युती सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवेल व सर्वांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)