हिवाळी अधिवेशनाच्या ‘मोर्चे’बांधणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘आघाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:48 PM2017-11-23T12:48:34+5:302017-11-23T12:51:50+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘मोर्चे’बांधणी केली जात आहे.

Congress-NCP's alliance for 'winter' session | हिवाळी अधिवेशनाच्या ‘मोर्चे’बांधणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘आघाडी’

हिवाळी अधिवेशनाच्या ‘मोर्चे’बांधणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘आघाडी’

googlenewsNext
ठळक मुद्देचव्हाण, तटकरे बैठकांसाठी सक्रिय विदर्भावरच सर्वांची भिस्त

कमलेश वानखेडे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘मोर्चे’बांधणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे तर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा निघणार आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या आधी मोर्चाचा मुहूर्त साधत एकप्रकारे काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.
११ तारखेला राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह सामान्य नागरिक सहभागी झाल्यावर पुन्हा १३ तारखेला काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होतील का, या प्रश्नाने काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे. शिवाय दोन वेगवेगळ्या मोर्चांनी विरोधकांमधील फूट चव्हाट्यावर येऊन सत्ताधाऱ्यांचे मनोबल उंचावेल. यामुळे आता दोन्ही मोर्चे एकाच दिवशी काढता येईल का, यावर दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत आहेत.
मोर्चे वेगवेगळे निघाले तर गर्दी जमविण्यासाठी दोन्ही पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. गर्दीसाठी दोन्ही पक्षांची भिस्त विदर्भावरच आहे. याची जाणीव असल्यामुळे मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी विदर्भातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. सुनील तटकरे व अजित पवार यांनी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अमरावती येथे तर दुपारनंतर नागपूर येथे विभागीय बैठक आयोजित केली आहे. खा. अशोक चव्हाण यांनी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अमरावती येथे व दुपारनंतर नागपूर येथे विभागीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही पक्षाच्या या बैठकांना प्रभारी, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसतर्फे कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्यावर्षी विधिमंडळावर काढण्यात आलेला मोर्चा लक्षणीय ठरला होता. लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर मरगळ आलेल्या काँग्रेसला या मोर्चात झालेल्या गर्दीने नवसंजीवनी दिली होती. यात नागपूरसह विदर्भाचे योगदान मोठे होते. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातून गर्दी जमविण्याचे स्थानिक नेत्यांनी आखलेले नियोजन यशस्वी ठरले होते. पुढे या मोर्चाच्या भरवशावर काँग्रेस नेत्यांना विधानसभेत व राज्यभर सरकारला कोंडीत पकडण्याची ऊर्जा मिळाली होती. त्यामुळे १३ डिसेंबरचा मोर्चा काँग्रेस नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमकपणा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनाधार वाढविण्यासाठी विदर्भावर फोकस केले आहे. आॅक्टोबर महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा करीत पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या. पक्षाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवस विदर्भात मुक्काम ठोकत गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आदी जिल्ह्यातील गावांचा दौरा केला. शेतकऱ्यांशी चर्चा केली. आता १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूरपर्यंत दिंडी काढली जाणार आहे. ११ डिसेंबर रोजी ही दिंडी मोर्चात परिवर्तित होईल. राष्ट्रवादीची टीम मोर्चेबांधणीसाठी कामाला लागली आहे.


दोन्ही मोर्चे एकत्रची तयारी, ‘१२-१२-१२’चा मूहुर्त
हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या मोर्च्यांचे मूल्यांकन साधारणत: त्यात होणाऱ्या गर्दीवरून केले जाते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे मोर्चे वेगवेगळे निघाले व गर्दी जमली नाही तर मोर्चे फसू शकतात. यामुळे आता दोन्ही पक्षांनी मिळून एकच मोर्चा काढायचा व मुख्य सभेला दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी संबोधित करायचे असे नियोजन उच्च पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रानुसार १२ डिसेंबर रोजी दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणाहून मोर्चा काढतील व दुपारी १२ वाजता एकत्र येत ‘१२-१२-१२’चा मुहुर्त साधतील.

Web Title: Congress-NCP's alliance for 'winter' session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.