काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘माझा कन्हैया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 03:06 AM2016-04-15T03:06:32+5:302016-04-15T03:06:32+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या दौऱ्याचे आयोजन नागपुरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात आले होते.

Congress, NCP's 'My Kanhaiya' | काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘माझा कन्हैया’

काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘माझा कन्हैया’

Next

दिवसभर नेत्यांची भाऊगर्दी : विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी
योगेश पांडे नागपूर
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या दौऱ्याचे आयोजन नागपुरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र कन्हैयाच्या भोवती बहुतांश वेळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेच कोंडाळे होते. दोन्ही पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनीदेखील कन्हैयाच्या या कार्यक्रमात उपस्थिती लावत स्वत:वर ‘फोकस’ घेण्याचा प्रयत्न केला. या पक्षांच्या ‘माझा कन्हैया’मुळे आयोजक असलेल्या काही विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त कन्हैया कुमार गुरुवारी सकाळी नागपुरात आला. यानिमित्त धनवटे महाविद्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ‘एनएसयूआय’ (नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया), ‘एआयएसएफ’ (आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन), ‘एआयएसबी’, ‘डीवायएफआय’, आरपीआय सेक्युलर स्टुडंट्स, युथ काँग्रेस, ‘एसएफआय’, ‘व्हीबीव्हीपी’, ‘एआयवायएल’, आपप्रणीत ‘सीवायएसएस’ इत्यादी संघटनांतर्फे प्रगतीशील छात्र युवा संघर्ष समिती या ‘बॅनर’अंतर्गत त्याच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु कन्हैया कुमार नागपूर विमानतळावर आल्यावर त्याला लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेरले व त्यांच्याच गाडीत बसून तो गेला. विमानतळावर आलेल्या इतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची यामुळे निराशा झाली. सभेदरम्यानदेखील सर्वच संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच बहुतांश संचालन करण्यात येत होते.

राजकीय नेत्यांची भाऊगर्दी
कन्हैया कुमारच्या सभेला उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष अनिल देशमुख, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, आ.प्रकाश गजभिये, सलिल देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, मनसेचे प्रशांत पवार इत्यादींचा समावेश होता. त्यांच्या येण्यामुळे अव्यवस्था वाढू शकते. विद्यार्थी संघटनांचा कार्यक्रम असताना राजकीय नेत्यांनी येथे येण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल यावेळी काही विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला.

हा श्रेय लाटण्याचाच प्रकार
राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच कन्हैयाभोवती कोंडाळे केले. तयारी आम्हीदेखील केली होती. परंतु कार्यक्रम पूर्ण व्हावा यासाठी आम्ही काही बोलत नसल्याची प्रतिक्रिया ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली. तर कार्यक्रमाचे श्रेय राजकीय पक्ष लाटण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे नाराज झालेल्या ‘सीवायएसएस’ने तर यातून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळेवर फूट दिसू नये यासाठी त्यांनीदेखील मौन राखले.

Web Title: Congress, NCP's 'My Kanhaiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.