काँग्रेसचा आता ‘झोन’वर हल्लाबोल

By admin | Published: July 10, 2017 01:51 AM2017-07-10T01:51:10+5:302017-07-10T01:51:10+5:30

महापालिकेतील दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे.

Congress is now attacking the zone | काँग्रेसचा आता ‘झोन’वर हल्लाबोल

काँग्रेसचा आता ‘झोन’वर हल्लाबोल

Next

समस्या निवारण समिती नेमणार : शहर काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक झोनस्तरावर समस्या निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. या समितीमध्ये नगरसेवक, लढलेले उमेदवार व त्या भागातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती दरमहा झोन अधिकाऱ्यांची भेट घेऊन व विविध नागरी समस्यांबाबत जाब विचारेल. मुदतीत प्रश्न सुटले नाही तर झोन कार्यालयात आंदोलन केले जाईल. स्थानिक पातळीवरचे प्रश्न हाताळून नागरिकांशी जवळीक साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
शहर जिल्हा काँग्रेस समितीची बैठक रविवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत राजकीय परिस्थिती, संघटनात्मक निवडणूक, शहर काँग्रेसची मालमत्ता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहर काँग्रेसची टीम कमालीची शांत होती. जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने नव्हती. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणेच बंद झाले होते. लोकमतने गेल्या आठवड्यात या विषयावर प्रकाश टाकला होता. शहर काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा झाली. कचरा, पाणी, स्वच्छता, मालमत्ता कर, बस वाहतूक, खोदलेले रस्ते, बंद पथदिवे आदी मुद्यांवर दरमहा झोनमध्ये जाऊन प्रशासन व सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनात्मक निवडणुकीसाठी शहर काँग्रेसने प्राथमिक सदस्य यादी प्रदेश काँग्रेसकडे सोपविली आहे. शहरात १९०० बूथ आहेत. ९ जुलै रोजी बूथ प्रतिनिधी व ब्लॉक प्रतिनिधी यांची यादी सादर करायची आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया केली जाईल. सदस्य नोंदणीची छाननी करण्याचे काम प्रदेश काँग्रेसने नेमलेली एक स्वतंत्र समिती करीत आहे. ही समिती अंतिम यादी प्रदेश काँग्रेसला सादर करेल. यात निवडणुकीची तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला; सोबतच लोकसभा निवडणुकीसाठी बूथनिहाय संघटनबांधणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बैठकीला उमाकांत अग्निहोत्री, विक्रम पनकुले, जयंत लुटे, किरण गडकरी, गजराज हटेवार, संदेश सिंगलकर, नितीश ग्वालबंसी, आसीम भाई, सरस्वती सलामे, दर्शनी धवड, अ‍ॅड. अशोक यावले, मिलिंद सोनटक्के, अनिल पांडे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, जयंत लुटे, अण्णाजी राऊत, विवेक निकोसे, प्रशांत कापसे, अरविंद वानखेडे, विजया ताजणे, निर्मला बोरकर आदी उपस्थित होते.

भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्यांवर टीका
काँग्रेसचे काही नेते भाजपा नेत्यांच्या पाठीमागे फिरत आहेत. काही नेते बँक घोटाळ्यात लिप्त आहेत. काहींवर बट्टा आयोगाचा ठपका आहे. त्यामुळे ते निष्क्रिय राहून अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करीत आहेत. यावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी टीका केली. असेच सुरू राहिले, काँग्रेस शांत राहिली तर पक्षाचे व पर्यायाने आपलेही अस्तित्व संपेल, अशी चिंता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अशा नेत्यांकडे दुर्लक्ष करून नवी फळी तयार करावी व भाजपाविरोधात आंदोलने सुरू करावीत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लावून धरली.
मालमत्तेची कागदपत्रे नाहीत
दोन दिवसांपूर्वी मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पक्षाच्या मालमत्तेची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर काँग्रेसची मालमत्ता किती व कुठे कुठे आहे, याची माहिती गोळा करण्यावर बैठकीत चर्चा झाली. शहर काँग्रेसच्या मालकीचे देवडिया भवन, इतवारा अनाज बजार येथे पाच हजार चौरस फुटाचा भूखंड, गंजीपेठ येथे एक भूखंड आहे. मात्र या सर्व मालमत्तेच्या मालकीची कागदपत्रे शहर काँग्रेसकडे नाहीत. ती जमा करणे व त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Congress is now attacking the zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.