काँग्रेसकडूनच आता प्रशासनावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:32+5:302021-05-16T04:07:32+5:30
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ...
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तुलनेत आरोग्य व्यवस्था फारच तकलादू आहे. प्रशासनाला निवेदने देऊन ऐकून घ्यायला तयार नाही. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण जनतेकडे लक्षच नाही. नेते, मंत्री यांना जनतेची पर्वाच नसल्यासारखे वागत असल्याची ओरड काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांकडून व्हायला लागली आहे. ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असतानाही कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे ग्रामीण भागाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पडून असलेले पाच व्हेंटिलेटर सुरू झाले नाही. रुग्ण वाढत असताना खाटांची व्यवस्था नाही. रामटेक, पारशिवनी व मौदा तालुक्यांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांना शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा नाही. कोरोनाच्या तपासणीसाठी मुबलक प्रमाणात कीट उपलब्ध नाही. आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण अत्यल्प आहे. रुग्णांना गृहविलगीकरणाची व्यवस्था नाही. यासंदर्भात काँग्रेसकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. जिल्हा परिषदेचा अख्खा कारभार केदार यांच्या मार्गदर्शनात सुरू असताना, ग्रामीणमध्ये लोकं उपचारांअभावी मृत्यू होत असतानाही उपाययोजना नाही. २२ लाख लोकसंख्येसाठी केवळ ९४ व्हेंटिलेटर, लोकसंख्येच्या एक टक्काही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रस्थ असतानाही लोकांना उपचार मिळत नसल्याची खंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडे ग्रामीण जनतेसाठी वेळच नसल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
- कार्यकर्त्यांचे ऐकत नसेल तर करणार काय?
ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नाही. तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे. कोणी ऐकत नसल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणावर नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रा) चे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव, राजा तिडके, जि.प. सदस्य शालिनी देशमुख, सरपंच शाहिस्ता पठाण, डॉ. सुधीर नाखले, निकेश भोयर, आदी कार्यकर्ते बसणार आहेत.