काँग्रेसचे पदाधिकारी देत आहेत शुभेच्छा : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:02 AM2019-03-28T01:02:05+5:302019-03-28T01:03:18+5:30
निवडणुकांच्या काळात साधारणत: विरोधी पक्षातील नेते एकमेकांपासून दूरच राहतात. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत. खुद्द गडकरी यांनीच याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विरोधकांच्या टीकेची दखल न घेण्याचीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकांच्या काळात साधारणत: विरोधी पक्षातील नेते एकमेकांपासून दूरच राहतात. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना चक्क काँग्रेसचेच पदाधिकारी फोन करून शुभेच्छा देत आहेत. खुद्द गडकरी यांनीच याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विरोधकांच्या टीकेची दखल न घेण्याचीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे.
नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी गणेशपेठ येथे उद्घाटन झाले. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, महापौर नंदा जिचकार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी फोन करीत आहेत. प्रचारादरम्यान मी शरीराने दुसऱ्या उमेदवारासोबत दिसलो तरी मनाने तुमच्याकडेच आहे, असे ते म्हणत आहेत. तसे पाहिले तर मी निवडणुकांची चिंताच करीत नाही. विरोधी पक्षावर किंवा त्यांच्या उमेदवारावर मी टीका करणार नाही. कार्यकर्त्यांनीदेखील टीकाटिप्पणी करू नये. केलेले कामच जनतेत घेऊन जायचे आहे. निवडणुकांच्या काळात विरोधकांकडून विविध वक्तव्ये येतील. मात्र कुणाच्याही वक्तव्यांची दखल घेऊ नका, असे गडकरी यावेळी म्हणाले. जे कामावर निवडून येऊ शकत नाहीत, ते जातीधर्माचा आधार घेतात. जातीपातीच्या राजकारणाला माझा विरोधच आहे. निवडणुकांत कुणालाही खोटे आश्वासन देण्याची गरज नाही. जे करू शकतो त्याबाबतच जनतेला सांगितले पाहिजे. नागपूरच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत ‘डबल इंजिन’ धावले. शहर हे पॅसेंजर ट्रेनच्या वेगाने नव्हे तर ‘बुलेट ट्रेन’प्रमाणे गतीने समोर गेले आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. संदीप जोशी यांनी संचालन केले.