कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 09:50 PM2023-05-23T21:50:01+5:302023-05-23T21:50:47+5:30
Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे.
नागपूर : कोराडी येथे प्रस्तावीत १३२० मेगावॅटच्या विस्तारित वीज प्रकल्पास आता काँग्रेसनेही विरोध केला आहे. कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. या प्रकल्पाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे.
कोराडी येथील वीज प्रकल्पात प्रत्येकी ६६० मेगावॅटचे दोन नवीन युनीट प्रस्तावित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ मे रोजी पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणी आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता पर्यावरणीय जनसुनावणी घेण्याचू सूचना जारी केली आहे. कोराडी, खापरखेडा येथील औष्णिक वीज प्रकल्पापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे आधीच माझ्या पश्चिम नागपूरकर त्रस्त आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतरही ‘फ्लू गॅस डेल्फ्रिनिंग प्लांट’ स्थापित केलेला नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कायम आहे. असे असताना आता पुन्हा कोराडी येथे आणखी दोन युनीट उभारले जात आहे. याला आपला तीव्र विरोध असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. जोपर्यंत सध्याच्या प्लांटमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार व शहर सचिव संदेश सिंगलकर यांनीही या प्रकल्पाला विरोध करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले यांनी संबंधित पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
मे च्या उन्हात भरदुपारी सुनावणी कशासाठी?
- नागपूरचे तापमान सतत वाढत आहे. नागरिक उन्हाच्या झळांनी आजारी पडत आहे. असे असताना २९ मे रोजी भरदुपारी १२:३० वाजता ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सूर्याघात आणि मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत लोकांना एकत्र येण्याची परवानगी देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध असल्यामुळे सुनावणीला हजारो लोक येण्याची शक्यता आहे. कोराडी प्लांटच्या आवारात ही सुनावणी होणार आहे. अनेक लोक कडक उन्हामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत.
लोकसहभाग नसेल तर जनसुनावणीचा संपूर्ण उद्देशच फोल ठरेल. त्यामुळे ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी आ. ठाकरे यांनी केली आहे.