केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:43+5:302021-05-31T04:07:43+5:30
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीच्या दिवशी नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात आले. ...
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीच्या दिवशी नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत देवडिया काँग्रेस भवनसमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार रविवारी आंदोलन करण्यात आले. मागील सात वर्षांत देशाचा नावालादेखील विकास झालेला नाही. केंद्र सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढली. लसीकरण करण्यात सरकारला अपयश आले आहे. पेट्रोलने शंभरी गाठली असून आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जनतेला महागाईचादेखील सामना करावा लागतो आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून बेरोजगारी वाढली आहे. केवळ काही उद्योगपतींना फायदा पोहोचावा याकडे केंद्र सरकार विशेष लक्ष देत आहे, असा आरोप या वेळी लावण्यात आला.
निदर्शने करताना उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, डॉ. गजराज हटवार यांच्यासह ब्लॉक अध्यक्षदेखील उपस्थित होते.
पेट्रोल दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावरच आंदोलन
काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात पेट्रोल दरवाढीविरोधात चक्क पेट्रोल पंपावरच आंदोलन करण्यात आले. या वेळी नाट्यरूपांतरणाच्या माध्यमातून जनतेवर इंधन दरवाढीचा कसा बोजा पडला आहे याचे सादरीकरण करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी झोप काढत सरकारचा निषेध केला. या वेळी आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.