पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात कॉँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:16+5:302021-06-09T04:11:16+5:30
रामटेक/काटोल/कोंढाळी : लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस अडचणीत आला आहे. पेट्रोल, डिझेलची नियमित दरवाढ सुरू आहे. अशात महागाईचा ग्राफ सातत्याने वाढतो ...
रामटेक/काटोल/कोंढाळी : लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस अडचणीत आला आहे. पेट्रोल, डिझेलची नियमित दरवाढ सुरू आहे. अशात महागाईचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात निदर्शने करण्यात आली.
रामटेक येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. जिल्हा महासचिव उदयसिंग यादव यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पारशिवनी तालुक्यात करंभाड येथे आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन निकोसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. कन्हान येथे जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. मौदा तालुक्यात बाभरे पेट्रोल पंपापुढे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर, जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य आदी उपस्थित होते.
वाडी येथे अमरावती रोडस्थित इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपापुढे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तक्षशीला वागधरे, शिक्षण सभापती भारती पाटील, पं.स. सभापती रेखा वरठी आदी उपस्थित होते. कोंढाळी येथे वर्धा रोड टी-पाॅईंटवर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश कॉँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश वसू यांच्या नेतृत्वात ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना निवेदन देण्यात आले. हिंगणा तालुक्यातील पंचवटी पेट्रोल पंप येथे जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टनकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. कामठी तालुक्यात आजनी येथे निदर्शने करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्या अवंतिका लेकुरवाळे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले आदी यावेळी उपस्थित होते.