काँग्रेस सज्ज, लाखोंच्या गर्दीची अपेक्षा

By admin | Published: April 11, 2016 02:58 AM2016-04-11T02:58:53+5:302016-04-11T02:58:53+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी नागपुरात येत आहेत.

Congress ready, millions expected | काँग्रेस सज्ज, लाखोंच्या गर्दीची अपेक्षा

काँग्रेस सज्ज, लाखोंच्या गर्दीची अपेक्षा

Next

दिग्गज नेते दाखल : दिवसभर तयारीचा आढावा
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी नागपुरात येत आहेत. सायंकाळी ५ वाजता कस्तूरचंद पार्कवर या दोन्ही नेत्यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सभेला दोन लाखावर लोक येतील, सभा यशस्वी होईल, अशी काँग्रेसजनांना अपेक्षा आहे.

सभेच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण शुक्रवारपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. शनिवारी दुपारी अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंग, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, बाला बच्चन, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र जोशी, अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष खुर्शीद अहमद, अनुसूचित जाती विभागाचे सचिव डॉ. प्रसाद, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते नागपुरात दाखल झाले. दिवसभर नेत्यांनी तयारीचा आढावा घेतला. पुन्हा एकदा दीक्षाभूमी व कस्तूरचंद पार्कची पाहणी केली.
सभेसाठी कस्तूरचंद पार्क सज्ज झाले आहे. सभोवताल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त शुभेच्छा देणारे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. शहरातही असे होर्डिंग्ज लागले आहेत.
याशिवाय सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे स्वागत करणारे बॅनरही लागले आहेत. कस्तूरचंद पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील विजेच्या खांबावर काँग्रेसचे झेंडे लावण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाली असून दिवसभर सुरक्षा पथकांनी सभास्थळाची तपासणी केली.(प्रतिनिधी)

शहर काँग्रेसच्या ४० टीम

कस्तूरचंद पार्कवरील सभेसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी ४० टीम तयार केल्या आहेत. या टीम मैदानावर तैनात राहतील. प्रत्येक टीममध्ये एक कॅप्टन व ४० सदस्य राहतील. सभेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकृती बिघडलेल्या व्यक्तीला मदत करणे, गोंधळावर नियंत्रण यासह सुरक्षा कवच म्हणून या चमू काम करतील. यासाठी मैदानाची ४० भागात विभागणी करण्यात आली असून त्यांना ‘स्पॉट’ नेमून देण्यात आले आहेत. शनिवारी सायंकाळी धांडे सभागृहात प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्व टीमची बैठक घेण्यात आली. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.
सराफा व्यापारी राहुल गांधींना भेटणार
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सराफा व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून बंद पुकारला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी भेटीसाठी वेळ देण्याची केलेली विनंती राहुल गांधी यांनी मान्य केली आहे. सभेनंतर रविभवन येथे सराफा व्यापारी राहुल गांधी यांची भेट घेऊन निवेदन देतील.

Web Title: Congress ready, millions expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.