दक्षिण नागपुरात काँग्रेसचा भाजपला दुसरा धक्का; नगरसेवक सतीश होले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 08:18 PM2022-02-22T20:18:51+5:302022-02-22T20:19:20+5:30

Nagpur News महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश होले यांना काँग्रेस प्रवेश घडृवून आणत दुसरा धक्का दिला आहे.

Congress second blow to BJP in South Nagpur; Corporator Satish Hole joins Congress | दक्षिण नागपुरात काँग्रेसचा भाजपला दुसरा धक्का; नगरसेवक सतीश होले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दक्षिण नागपुरात काँग्रेसचा भाजपला दुसरा धक्का; नगरसेवक सतीश होले यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या ...

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने दक्षिण नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक छोटू भोयर यांना उमेदवारी देऊन धक्का दिला होता. आता महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे नगरसेवक व माजी उपमहापौर सतीश होले यांना काँग्रेस प्रवेश घडृवून आणत दुसरा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लावलेली फिल्डिंग कामी आली असून भाजपच्या या दोन्ही वजनदार नगरसेवकांच्या काँग्रेस प्रवेशामुळे दक्षिण नागपुरात काँग्रेसची ताकद वाढली आहे.

विधानसभा व २०१७च्या महापालिका निवडणुकीत दक्षिण नागपूर भाजपचा गड राहिला होता. मात्र काही महिन्यातच भाजपच्या दोन वजनदार नगरसेवकांनी काँग्रेसचा हात धरल्याने भाजपच्या गडाला जबर हादरा बसला आहे. सतीश होले सलग चार वेळा या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रवेशाने मनपा निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढली आहे.

मंगळवारी सोमवारी पेठ येथील स्व. जयंतराव लुटे स्मृती उद्यान लोकार्पण कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सतीश होले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ॲड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आता तर ही सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या ....असा सूचक इशारा देत भाजपचे अनेक नगरसेवक व मोठे नेते लवकरच काँग्रेसमध्ये दिसणार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. २०१७च्या महापालिका निवडणुकीत भाजपने नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण तर केली नाहीच, त्यांच्याच कार्यकर्त्यांना दिलेला शब्दही पाळला नाही. त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षनेतृत्वावर चिडलेले आहेत. हा असंतोष मनपा निवडणुकीच्या तोंडावर बघायला मिळणार असल्याचेही पटोले म्हणाले.

नागपूरकरावर आर्थिक बोझा बसवला. मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामात जनतेच्या पैशाची लूट केली. भाजपने ठरवून हे पाप केले. आता काँग्रेस विचाराचा माणूस काँग्रेसकडे वळला आहे. सतीश होले ही तर फक्त सुरुवात आहे. मनपा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक मोठे नेते काँग्रेसमध्ये दिसतील, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: Congress second blow to BJP in South Nagpur; Corporator Satish Hole joins Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.