पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस-शिवसेना रस्त्यावर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:08 AM2021-02-07T04:08:04+5:302021-02-07T04:08:04+5:30
नागपूर : एकीकडे भाजपने राज्यातील वीज दरवाढीचा विषय हाती घेतला असून, रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर दुसरीकडे राज्यातील सत्तेत ...
नागपूर : एकीकडे भाजपने राज्यातील वीज दरवाढीचा विषय हाती घेतला असून, रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर दुसरीकडे राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना व काँग्रेसही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विषय हाती घेत रस्त्यावर उतरले आहे. शनिवारी शिवसेना व काँग्रेस यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात वेगवेगळे आंदोलन केले.
शिवसेनेने बैलबंडी ओढून केला निषेध
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दररोज होत असलेल्या दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी संविधान चौकात निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोटारसायकल बैलबंडीत ठेवली आणि बैलबंडी ओढत दरवाढीचा निषेध केला. पक्षाचे संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात व महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी रामदेवबाबा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. कोरोनामुळे आधीच नागरिकांची आथिक स्थिती बिघडली आहे. यातच पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचे मानमोडे यांनी सांगितले. आंदोलनात पक्षाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांच्यासह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना आदींचे पदाधिकारी सहभागी झाले होते.