काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:44+5:302021-09-03T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसने १५ वर्षांच्या कामाचा हिशेब मागितल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसचे नेते तय्थहीन आरोप करीत आहेत. जनता कुणाला बक्षीस देईल, हे मतपेट्यातून स्पष्ट होईलच. काँग्रेसने परत पराभवाचा सामना करायला तयार राहावे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले. कामाच्या मुद्यावर दोन्ही शहराध्यक्ष आमने-सामने आले असून, येत्या काळात राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
गेल्या १५ वर्षांत महापालिकेत केलेल्या कामाचा हिशेब द्यावा व याच्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केली होती. त्यावर दटके यांनी भाजपची बाजू मांडली. अनेक वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने शहराचा सत्यानाश केला व नागपूरला एक मोठे खेडे बनविले. भाजपने मोठ्या खेड्याला शहराचे स्वरूप दिले आहे. जनता भाजपवर खूश आहे. आज भाजपच्या काळातील रस्ते, पूल, मेट्रो बघा. नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनत असल्याचे बघून काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून काहीतरी आरोप करीत सुटली आहे. राजकारणासाठी त्यांनी आरोप जरूर करावेत, मात्र अनेक वर्षे महापालिका आपल्या ताब्यात होती तेव्हा आपण हे सगळे का करू शकलो नाही याचे आत्मपरीक्षणसुद्धा करावे, असे दटके म्हणाले.
अगोदर स्वत:ची गटबाजी सांभाळा
दटके यांनी गटबाजीवरून काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले. वेगवेगळे गट असलेल्या काँग्रेसने इतर पक्षांना उपदेश देऊ नये. ज्यांना अंतर्गत वादामुळे पंजा फ्रीज करावा लागला होता. ज्यांनी आपल्याच पक्षाचे बी फॉर्म दोन-तीन जणांना दिले होते. ज्यांचे नगरसेवक त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना माईक फेकून मारत आहेत, ते महापालिकेत सत्तेत येऊन काय करणार, हे जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, असे दटके म्हणाले.
काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार
भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कुठल्या तोंडाने मतदारांसमोर जाणार आहे? विकास ठाकरे स्वत: महापौर असताना त्यांनी काय दिवे लावले, महापौर म्हणून ते एक दिवसही धड सभागृह चालवू शकले नाही. अशाच नाकर्तेपणामुळे नागपूरची जनता त्यांना भविष्यातही घरीच बसविणार आहे, असे प्रतिपादन मेश्राम यांनी केले.