एसआरएच्या कार्यालयावर काँग्रेसची धडक

By Admin | Published: July 16, 2016 03:09 AM2016-07-16T03:09:55+5:302016-07-16T03:09:55+5:30

मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली.

Congress slams SRA's office | एसआरएच्या कार्यालयावर काँग्रेसची धडक

एसआरएच्या कार्यालयावर काँग्रेसची धडक

googlenewsNext

झोपडीधारकांचे आधी पुनर्वसन करा : झोपड्या तोडल्यास रस्त्यावर उतरू
नागपूर : मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली. या झोपडपट्ट्या सन २००० पूर्वीच्या असतानाही येथील नागरिकांचे पुनर्वसन न करता तोडण्यात आल्या याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी एसआरए (झोपडपट्टी विकास प्राधिकरण)च्या कार्यालयावर धडक देण्यात आली. झोपडी तोडलेल्या नागरिकांना एसआरए अंतर्गत त्वरित घर द्यावे, अशी मागणी करीत यापुढे नियमित झालेल्या झोपडपट्ट्या तोडल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
के.टी.नगर, काटोल रोड येथे एसआरएचे कार्यालय आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपूर झोपडपट्टी सेलचे राम कळंबे यांनी शेकडो झोपडीधारकांना सोबत घेत या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी जोरदार नारेबाजी करीत एसआरए सहायक आयुक्त रहाटे यांना घेराव घालण्यात आला. गोदावरीनगर व गंगानगर या सन २००० पूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या. येथे नळ आहे. वीज आहे. नागरिक महापालिकेचा कर भरतात. त्यानंतरही झोपड्या कशा तोडण्यात आल्या, असा सवाल राम कळंबे यांनी केला.
विकास ठाकरे म्हणाले, सन २००० पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायद्यानुसार संरक्षण प्राप्त झाले आहे. संबंधित झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवायच्या झाल्यास आधी संबंधितांची पर्यायी निवासव्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, या नागरिकांची पर्यायी व्यवस्था न करताच त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. झोपडीधारकांवरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या २० वर्षांपासून हे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. याच भागात यांचे रोजगार व व्यवसाय आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उत्तर नागपुरातील एखाद्या कोपऱ्यात नेऊन बसविणे योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे वास्तव्य असलेल्या भागातच एसआरए अंतर्गत गाळे बांधावे व या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यावर रहाटे यांनी झोपडपट्टी असलेल्या भागात सर्वेक्षण केले जाईल व जागा उपलब्ध असल्यास तेथे एसआरए अंतर्गत घर बांधून दिले जाईल, असे आश्वासन दिले. दीपक वानखेडे, सुनील चोपडा, हरीश ग्वालबंसी, नितीश ग्वालबंसी, घनशाम मांगे, रंजना मडावी, आसीफ अंसारी, बंटी शेळके, रिजवान शेख, सायरा, रंजना राऊत, जितु मस्के, दिलीप मामिक, मोहम्मद इस्माईल, विभल विदावत, आनंद तिवारी, धीरज पांडे, देवेंद्र कौरती, शालिक भांडारकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

 

Web Title: Congress slams SRA's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.