"काँग्रेसने जातीवादावर मते मागितली" : चंद्रशेखर बावनकुळे
By कमलेश वानखेडे | Updated: June 6, 2024 18:26 IST2024-06-06T18:25:22+5:302024-06-06T18:26:06+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप : संविधान बद्दलवणार असा अपप्रचार केला

Congress sought votes on casteism : Chandrashekhar Bawankule
नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जातीवादावर मते मागितली. इंडिया आघाडीकडून संविधान बदलवणार असा खोटा अपप्रचार करण्यात आला. जातीवाद राजनीती जिंकली. विकासाच्या राजनीतीचा पराभव झाला. भाजपने विकसित भारतासाठी मत मागितले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
बावनकुळे म्हणाले, आता सोयीचा निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडी ईव्हीएमवर बोलत नाही. हे खोटे बोलून मत घेतात. एकदा जनता भ्रमित झाली. नेहमी होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम केले. राज्यात घरकुल दिले, शेतकऱ्यांना सन्मान दिला, तरीही जनतेने काही क्षणासाठी दूर केले. महाविकास आघाडीने मुस्लिम, बौद्ध, आदिवासी समाजाला भीती दाखवण्याच काम केले. जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखवल्या. आपण केंद्रीय नेतृत्त्वाला विनंती केली आहे की त्यांनी फडणवीस यांना सरकारमध्ये ठेवावे. फडणवीस यांनी काम केले. मात्र, त्यांच्याबाबात गैरसमज पसरविले गेले. ते थोडे कमजोर झाले. एक निवडणूक हरल्याने काही फरक पडत नाही. फडणवीस यांचा राजीनामा वरिष्ठ नेतृत्व स्वीकारणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी देशाचे नेते आहेत. मतदानाचा टक्केवारीत आम्ही पुढे आहे, काही जागा कमी मतांनी हरलो, मागील वेळीच्या तुलनेत मत वाढले आहेत. महाविकास आघाडीचा विजय कपट कारस्थान शकुनी नितीने झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील
- शुक्रवारी दिल्ली येथे संसदीय मंडळाची बैठक आहे. त्यासाठी आम्ही चाललो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वणवण फिरून काम केले. महायुतीच्या उमेदवादारासाठी आम्ही ताकदीने लढलो आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांबद्दल कुणीच संभ्रम करू नये. आम्ही तिन्ही पक्ष आत्मचिंतन करून त्यात सुधारणा करू. राज्यात महायुतीच्या पुन्हा २०० जागा निवडून येतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.