काँग्रेसमध्ये फूट, भाजपाला सूट

By Admin | Published: July 3, 2017 02:27 AM2017-07-03T02:27:56+5:302017-07-03T02:27:56+5:30

नागपूर शहराच्या व महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेस नेते अंतर्गत भांडणात गुंतले आहेत.

Congress split, BJP's suit | काँग्रेसमध्ये फूट, भाजपाला सूट

काँग्रेसमध्ये फूट, भाजपाला सूट

googlenewsNext

विरोधी पक्षाचे अस्तित्वच नाही : कसा राहणार सत्ताधाऱ्यांवर वचक?
कमलेश वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराच्या व महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेस नेते अंतर्गत भांडणात गुंतले आहेत. यामुळे सत्ताधारी भाजपाला मनमर्जी कारभार करण्याची सूट मिळाली आहे. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर कुठलाही वचक राहिलेला नाही. शहरात विरोधी पक्षाचे अस्तित्व आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे.
शहर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाली आणि अंतर्गत वाद सुरू झाला. माजी मंत्री नितीन राऊत व सतीश चतुर्वेदी यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना डावलल्याचा उघड आरोप केला. यातूनच राऊत समर्थकांनी शहर काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार घालणे सुरू केले. पुढे हा वाद वाढतच गेला. महापालिकेच्या तिकीट वाटपातही या वादाचे पडसाद उमटले. काही जागांवर तर डबल एबी फॉर्म दिल्या गेले. काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असे चित्र काही प्रभागात पाहायला मिळाले. ठाकरे यांनी आपल्या समर्थकांचे तिकीट कापल्याचा आरोप करीत राऊत-चतुर्वेदी एकत्र आले. दोन्ही बाजूने एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी शक्ती पणाला लावली गेली. अंतर्गत लढ्यात काँग्रेसचे पानिपत झाले. फक्त ३९ जागा विजयी झाल्या. भाजपाचा एकतर्फी मोठा विजय झाला.
पराभवानंतरही काँग्रेस नेत्यांनी धडा घेतला नाही. विरोधी पक्षनेता निवडीच्या मुद्यावरून पुन्हा गटबाजी उफाळून आली. मुत्तेमवार- ठाकरे यांनी संजय महाकाळकर यांचे नाव समोर केले तर, चतुर्वेदी-राऊत यांच्याकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर करण्यात आले. शेवटी महाकाळकर यांची वर्णी लागली. यानंतर प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे यांनी एकत्र येत नगरसेवकांना सोबत घेऊन दिल्लीवारी केली व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कैफियत मांडली. दिल्लीभेटीनंतर त्यांना बळ मिळाले व त्यांनी नगरसेवकांची बैठक घेत संजय महाकाळकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित केला. गुडधे यांनी माघार घेत तानाजी वनवे यांचे नाव विरोधी पक्षनेत्यासाठी समोर केले.
विभागीय आयुक्तांकडे वनवे यांच्या नावाच्या समर्थनाचे पत्र दिले. महापालिकेत १६ नगरसेवक ओळखपरेडसाठी उपस्थित राहिले. शेवटी वनवे यांना विरोधी पक्षनेतेपद सोपविण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. या निर्णयाला महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. काँग्रेसचे संपूर्ण लक्ष या अंतर्गत लढाईकडे लागले आहे. त्यामुळे भाजपाच्या मार्गातील सर्व काटे दूर झाले आहेत.
चतुर्वेदी, राऊत, अहमद
माजी मंत्रीही गप्पच
नागपुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व अनिस अहमद यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपदे भूषविली आहेत. मात्र, सत्ता गेल्यानंतर सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावताना ही नेतेमंडळी दिसत नाही. गेल्या तीन वर्षांत चतुर्वेदी, राऊत, अहमद या तीन नेत्यांनी एकदाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक शब्दही काढलेला नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका केली नाही. राज्याचा विषय तर सोडाच, पण नागपुरातील विषयावरही या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून भाजपाला असेच ‘सेफ गार्ड’ मिळत राहिले तर काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता भाजपा नेत्यांविरोधात रस्त्यावर उतरण्याचे धाडस कसा करेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


ठाकरेंमधील आंदोलक मवाळ
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहर अध्यक्ष विकास ठाकरे कमालीचे सक्रिय होते. भाजपा विरोधात त्यांनी अनेकदा तीव्र आंदोलने केली. व्हेरायटी चौकात धरणे दिले, झाशी राणी चौकात बस अडविल्या. भाजपाच्या टिळक पुतळा कार्यालयावरही धडक दिली. मात्र, निवडणुकीनंतर ठाकरेंमधील आंदोलक मवाळ झाल्याचे दिसत आहे. अंतर्गत गटबाजीचा सामना करताना ठाकरे यांचा कस लागत आहे. त्यामुळे भाजपा विरोधात मोठा लढा उभारताना शहर काँग्रेस दिसत नसल्याचे चित्र आहे. गटबाजीकडे दुर्लक्ष करीत शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महापालिकेची निवडणूक लढलेले उमेदवार सोबत घेऊन ठाकरे भाजपा विरोधात एल्गार का पुकारत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

-तर भाजपमध्ये प्रवेश करणे काय वाईट आहे ?
- शहरातील काँग्रेसचे नेते भाजपा नेत्यांनाा मॅनेज आहेत, असा आरोप आता काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहेत. भाजपा विरोधात एकही नेता मैदानात उतरण्यास तयार नसल्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस नेते जर पडद्यामागे भाजपा नेत्यांशी हातमिळवणी करणार असतील तर मग आम्ही थेट भाजपात प्रवेश घेतला तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल कार्यकर्ते करू लागले आहेत. या अस्वस्थतेतून आता भाजपामध्ये प्रवेश होऊ लागले आहेत.

Web Title: Congress split, BJP's suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.