... तर निश्चित माझ्यावर कारवाई करा, मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 03:47 PM2022-01-18T15:47:53+5:302022-01-18T17:27:39+5:30
लोकांनी तक्रार केलेला गावगुंड तिथे नसेल तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई करा, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
नागपूर : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह शब्दात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, दुसरीकडे भंडारा पोलिसांनी कथित मोदी गावगुंडाला ताब्यात घेतले असल्याचे सांगत भाजप मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा आणि वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत खबळजनक वक्तव्य केल होत. 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं ते म्हणाले होते. यानंतर भाजप आक्रमक झाले आहे. राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत असून पटोलेंच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.
नागपुरात आल्यानंतर पटोलेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडले आहे. पोलिसांकडून लोकांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. मात्र, भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानपद हे एका पक्षाचे नसते, ते देशाचे असतात. पंतप्रधानांचा आम्ही नेहमीच सन्मान करत आहोत. मी काही भाषण देत नव्हतो. मी लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांच्याशी बोलत होतो. परंतु, भाजपने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी भंडारा पोलिसांना याबाबत तपास करण्यास सांगितले आहे. लोकांनी तक्रार केलेला गावगुंड तिथे नसेल तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई करा, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात लोकांशी बोलताना एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नाना पटोले यांनी आज गडचिरोलीत बोलतांना खुलासा केला. 'जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहे. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरू आहे आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो वेळ आली तर मारू सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही, असं आश्वासन दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा पटोले यांनी केला.