महायुती सरकारच्या काळात अण्णा आजारी, झोपी गेले; वडेट्टीवार यांची टीका
By कमलेश वानखेडे | Published: June 14, 2024 06:18 PM2024-06-14T18:18:53+5:302024-06-14T18:19:26+5:30
जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल
कमलेश वानखेडे, नागपूर: महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्रात एवढे सगळे घोटाळे झाले, त्यावेळेस अण्णा हजारे बोलले नाहीत. मागील पाच वर्षात आम्ही अनेरक गंभीर प्रकरणे समोर आली. भाजपच्या दहा मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी नेमके अण्णा आजारी होते, झोपी गेले होते. आता अण्णा जागे झाले याचा आनंद आहे, असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना काढला.
शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दावे करीत असले तरी त्यांच्यामुळेच भाजपने विश्वासहर्ता गमावली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला देशात अडीचशेसुद्धा पार करता आले नाही. महाराष्ट्रात त्यांचा पक्ष एक आकड्यावर आला. त्यांचे ७९ उमेदवार एक लाख मतांच्या फरकांनी पराभूत झाले आहेत. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेनी नाकारले आहे. राज्यातील त्रिकूट सरकारचा अनैतिक कारभार सुरू आहे. महाविकास आघाडीला कोणीही हरवू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. जागावाटप दिल्लीत हायकमांड ठरवेल. प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बवानकुळे यांना चिमटा
बावनकुळे यांनी मविआला मत न देण्याचे आवाहन केले. यावर वडेट्टीवार म्हणाले, माविआ ला मत देऊ नका त्यांना मत द्या, म्हणजे दोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या दहा लाख होतील. बेरोजगार युवकांनी आत्महत्या केल्या त्यात वाढ होईल. महागाई भरमसाठ वाढेल. त्यांचा आनंद लोकांना होईल. चीन देशात घुसला त्याचा आनंद होईल. काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या त्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना मत द्या, ही त्यांची कदाचित मागणी असेल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.