भाजपाच्या घोषणांचे काँग्रेस करणार चावडी वाचन
By admin | Published: July 9, 2017 01:57 AM2017-07-09T01:57:06+5:302017-07-09T01:57:06+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध घोषणा केल्या.
घोषणा फसव्या असल्याचा दावा : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध घोषणा केल्या. मात्र या घोषणा कशा फसव्या आहेत याचा पाढा आता काँग्रेसतर्फे जनतेत जाऊन वाचला जाणार आहे. प्रत्येक गावात ‘चावडी वाचन’ कार्यक्रम घेऊन भाजपाच्या घोषणांची पोलखोल करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत माजी आमदार आनंदराव देशमुख, देवराव रडके, एस.क्यु. जमा आदी उपस्थित होते.
यावेळी मुळक म्हणाले, सरकारच्या निर्णयांमुळे निर्माण झालेले अराजक गाव पातळीपर्यंत पोहचविले जाईल. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे. प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, किती शेतकरी वंचित राहिले, खरोखर कितींचा सातबारा कोरा होईल, याचा लेखाजोखा शेतकऱ्यांसमोर मांडला जाईल. सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ५ हजार कोटीच माफ होणार आहेत. राज्यात १ लाख ३६ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी फक्त १ हजार ३२ शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे वाटप मिळाले आहे. ही सर्व माहिती गावात जाऊन शेतकऱ्यांसमोर ठेवली जाईल.
जीएसटीने छोटा व्यापारी, किराणा दुकानदार, बी-बियाणे विक्रेते यांच्या व्यवसायांवर संकट येणार आहे. काँग्रेस सरकारने जास्तीत जास्त १८ टक्के जीएसटी आकारण्याची शिफारस केली होती. भाजपाने ती ३४ टक्क्यांवर नेली आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसेल.
याचीही माहिती जनतेला दिली जाईल, असे मुळक यांनी सांगितले. ग्राम पंचायतचे पाणी पुरवठ्याचे बिल थकीत असेल तर कनेक्शन कापले जाते. मात्र तसे न करता हे बीज बिल सरकारने भरावे, असा ठराव १ मे रोजी घेण्यात आला होता. ते सर्व ठराव मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.या वेळी बाबुराव तिडके, चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, कुंदा राऊत, मनोहर कुंभारे, तक्षशिला वाघधरे, अवंतिका लेकुरवाळे, दयाराम भोयर, नाना कंभाले, मनोज तितरमारे, अरुण हटवार, आमधरे, गंगाधर रेवतर, तुळशीराम काळमेघ, सुरज इटनकर, रमेश जोध आदी उपस्थित होते.