काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी, सेना लढणार स्वबळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:05+5:302021-07-07T04:09:05+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने शेकापला सोबत घेत आघाडी केली. पण राज्यात महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या ...
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने शेकापला सोबत घेत आघाडी केली. पण राज्यात महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला आघाडीपासून दूरच ठेवले. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णत्घेत एक प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादीलाच आव्हान दिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी २२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
पोटनिवडणुकीला कारणीभूत असलेले ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले असले तरी, काँग्रेस व भाजपने मात्र ओबीसींना प्रतिनिधित्व देऊन रिंंगणात उतरविले. ५८ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे होते. तर प्रत्येकी ४ सदस्य राष्ट्रवादी व भाजपचे होते. शेतकरी कामगार पक्षाच्या एका सदस्यालाही फटका बसला होता.
खुल्या झालेल्या १६ जागांवर ५० टक्के महिलांचे आरक्षण काढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दिग्गजांना पत्नीला रिंगणात उभे करावे लागले. काँग्रेस व राष्ट्रवादीने गेल्या वेळी लढलेल्या उमेदवारांनाच यंदाही रिंगणात उतरविले. भाजपने मात्र उमेदवारी वाटप करताना विरोधी पक्षनेत्यांची तिकिटे कापून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तर ९ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. शिवसेनेने निवडणुकीत १२ जागांवर उमेदवार उभे केल्याने चांगलीच चुरस निर्माण केली. डिगडोह जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजप व राष्ट्रवादीने उमेदवाराची पळवापळवी केली. भाजपने राष्ट्रवादीच्या तर राष्ट्रवादीने भाजपच्या उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी दिली.