पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:43+5:302021-05-16T04:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन ...

Congress will start agitation against the government's decision to cancel the reservation in promotion | पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार

पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी केले.

या शासननिर्णयाविरुद्ध सर्व पातळीवर आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या व्हीसीद्वारे बैठकीत घेण्यात आला. राऊत यांच्या विशेष उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना राऊत यांनी या शासननिर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या गरजेवर भर दिला.

१९७४ पासून लागू असलेल्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाने काँग्रेसचे प्रमुख नेते व अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक व्हीसीद्वारे बैठक घेतली. या बैठकीला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव संपतकुमार, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्रचे प्रभारी मनोज बागडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई नगराळे, विजय आंभोरे आदी उपस्थित होते.

यावेळी राऊत यांनी चारसूत्री आंदोलनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन भूमिका मांडणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून जीआर कसा घटनाविरोधी आहे, हे पटवून देणे व जिल्हास्तरावर अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावी, अशी सूचना राऊत यांनी केली.

या सूचनांना सर्वच नेत्यांनी सहमती दर्शविली. यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पदोन्नतीतील आरक्षण हटविण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची दलितांमध्ये असलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोकांचा खटाटोप सुरू असल्याचे सांगितले. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच संपतकुमार यांनी अ. भा. काँग्रेस समितीच्या माध्यमातून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र डेहाडे यांनी केले तर आभार प्रशांत पवार यांनी मानले.

Web Title: Congress will start agitation against the government's decision to cancel the reservation in promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.