सरपंच निवडणुकीत काँग्रेसची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:08+5:302021-02-12T04:09:08+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९ पैकी ६१ ग्रा.पं.वर काँग्रेससमर्थित पॅनलचे ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात १२९ पैकी ६१ ग्रा.पं.वर काँग्रेससमर्थित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. यासोबतच ३५ ग्रा.पं.मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (१५), शिवसेना (३), वंचित बहुजन आघाडी (१), मनसे (१), तर सात ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनलचे उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहे. जिल्ह्यात दि. १५ जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या १२९ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात काटोल तालुक्यात माळेगाव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीसमर्थित जया वानखेडे यांची वर्णी लागली. खंडाळा खुर्द येथे जनशक्ती पॅनेलच्या सुरेशा किशोर सय्याम, तर भोरगड येथे परिवर्तन पॅनलचे उमराव बकराम उईके यांनी सरंपच होण्याचा मान मिळाला आहे. खंडाळा (खुर्द) आणि भोरगड ग्रा.पं.वर भाजपने दावा केला.
नरखेड तालुक्यात १७ पैकी १३ ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीसमर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहे. येथे खैरगाव, पेठईस्लामपूर आणि मदना ग्रा.पं.चे सरपंचपद आरक्षित संवर्गातील उमेदवार नसल्याने रिक्त राहिले. उमठा ग्रा.पं.च्या सरपंचदी भाजपसमर्थित पॅनलचे प्रकाश पंजाबराव घोरपडे विजयी झाले.
पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघातील कळमेश्वर तालुक्यात ५ ग्रा.पं.मध्ये काँग्रेससमर्थित उमेदवारांची सरपंचपदी वर्णी लागली. सावनेर तालुक्यात १२ पैकी ९ ग्रा.पं.मध्ये काँग्रसचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. तीन ग्रा.पं.मध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंच पदाची निवडणूक झाली नाही. या तिन्ही ग्रा.पं.मध्ये उपसरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. केदार यांचे होमटाउन असलेल्या पाटणसावंगी येथे काँग्रेसच्या रोशनी ठाकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू पारवे आणि भाजपचे नेते सुधीर पारवे यांनी ग्रा.पं.ची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. उमरेड तालुक्यात सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी दमदार राहिली. तालुक्यात निवडणूक झालेल्या १४ पैकी ११ ग्रा.पं.वर भाजप समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले. काँग्रेसला केवळ तीन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदासाठी संधी मिळाली. कुही तालुक्यात २४ पैकी १४ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे, तर दहा ग्रा.पं.मध्ये भाजपचे सरपंच विजयी झाले आहेत.
भिवापूर तालुक्यात निवडणूक झालेल्या तीनपैकी दोन ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित, तर एका ग्रा.पं.मध्ये भाजपसमर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. पूल्लर येथे काँग्रेसचे हिरालाल राऊत आणि आलेसूर येथे दिलीप दोडके विजयी झाले. मोखाबर्डी ग्रा.पं.मध्ये भाजपाच्या रूपाली सोनटक्के यांनी बाजी मारली.
हिंगणा तालुक्यात निवडणूक झालेल्या पाच पैकी तीन ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीचा, तर एका ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीसमर्थित पॅनलचा उमेदवार विजयी झाला. तालुक्यातील सावंगी आसोला ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे शेषराव नागमोते, तर दाभा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपसमर्थित शीला श्रावण मरपाची यांची वर्णी लागली.
पारशिवनी तालुक्यात दहा पैकी चार ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात तीन ग्रा.पं.मध्ये काँग्रेस, तर दोन ग्रा.पं.मध्ये शिवसेना समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील बोरी (सिंगारदीप) ग्रा.पं.चे सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला करीता राखीव आहे. या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहीले. या तालुक्यात काही ग्रा.पं.मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनने एकत्र निवडणूक लढविली होती. मौदा तालुक्यात ७ पैकी ५ ग्रा.पं.मध्ये काँग्रेससमर्थित गटाचे सरपंच विजयी झाले. दोन ग्रा.पं.मध्ये भाजापसमर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले.
नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ पैकी ७ ग्रा.पं.मध्ये काँग्रेस, ३ भाजप, तर एका ग्रा.पं.मध्ये वंचित बहुजन आघाडीला सरपंचपदी संधी मिळाली.