कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 09:46 PM2023-05-13T21:46:57+5:302023-05-13T21:47:51+5:30

Nagpur News कर्नाटकप्रमाणेच नागपुरातही परिश्रम घेऊ व महापालिकेवर विजयी झेंडा फडकवू, असा दावा कार्यकर्ते दुणावलेल्या आत्मविश्वासाने करीत आहेत.

Congress workers 'shocked' by Karnataka results; Gained strength for municipal elections | कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ

कर्नाटक निकालाने काँग्रेस कार्यकर्ते ‘टकाटक’; महापालिका निवडणुकीसाठी मिळाले बळ

googlenewsNext

नागपूर : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भाजपचे पानिपत केले. या निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून जोमाने काम करण्यासाठी एकप्रकारे बळ मिळाले आहे. कर्नाटकप्रमाणेच नागपुरातही परिश्रम घेऊ व महापालिकेवर विजयी झेंडा फडकवू, असा दावा कार्यकर्ते दुणावलेल्या आत्मविश्वासाने करीत आहेत.

कर्नाटकचा निकाल काँग्रेसच्या बाजूने येईल, असा अंदाज विविध सर्वेक्षणात आधीच व्यक्त करण्यात आला होता. सकाळी सुरुवातीच्या निकालात भाजपने आघाडी घेतली असता काँग्रेस कार्यकर्ते हिरमुसले होते. मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकली काँग्रेसच्या जागा वाढू लागल्या व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिवात जीव आला. शहर काँग्रेसने देवडिया भवनात जल्लोष केला. काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण आगरे यांच्यातर्फे भांडे प्लॉट चौकात जल्लोष करण्यात आला. अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष वसिम खान यांच्या नेतृत्वात मोमिनपुरा चौकात फटाके फोडण्यात आले. उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वात इतवारी परिसरात मिठाई वितरित करण्यात आली. एवढेच नव्हे तर शहरभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्ते फोन करून एकमेकांना शुभेच्छा देत होते.

राऊत, केदार, वडेट्टीवार, ठाकरेंचे योगदान

- कर्नाटक निवडणुकीसाठी माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार व आ. विकास ठाकरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करीत विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या नेत्यांना संबंधित मतदारसंघ जिंकण्यात यश आले. विजयात योगदान दिल्याबद्दल या काँग्रेस नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून चौफेर अभिनंदन होत आहे. हे नेते असेच एकोप्याने भाजप विरोधात लढले तर नागपूरसह विदर्भातही पुन्हा एकदा काँग्रेसचा दबदबा निर्माण होईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

गटबाजीचे ‘नाटक’ न करण्याचा धडा

- अंतर्गत गटबाजी सोडून काँग्रेस नेते एकत्र येत ताकदीने लढले तर काय होऊ शकते हे कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी यापासून आतातरी धडा घेतला व एकदिलाने काम केले तर महापालिकेवर विजयी झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कार्यकर्ते निकालानंतर व्यक्त करीत होते.

Web Title: Congress workers 'shocked' by Karnataka results; Gained strength for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.