पाण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल
By admin | Published: May 9, 2015 02:22 AM2015-05-09T02:22:41+5:302015-05-09T02:22:41+5:30
शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी काँग्रेसने महापालिकेत हल्लाबोल केला.
नागपूर : शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी काँग्रेसने महापालिकेत हल्लाबोल केला. रिकामे मडके घेऊन आलेल्या काँग्रेसजनांनी तब्बल दीड तास महापौर प्रवीण दटके यांना घेराव घातला. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत. नगरसेवकांनी पाणी देण्याची मागणी केली, आग्रह धरला तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे, असे सांगत ओसीडब्ल्यूचा करार रद्द करा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. आपणही कंपनीच्या दबाबात असाल तर राजीनामा द्या, अशी मागणीही महापौरांकडे करण्यात आली.
विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत धडकले. सुरुवातीला महापौर प्रवीण दटके कक्षात नसल्यामुळे त्यांनी महापौर कक्षात नारेबाजी करीत ठाण मांडले. काही वेळातच महापौर आले. नगरसेवकांच्या मागणीवरून महापौर दटके यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पुढे दीड तास काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापौरांना घेराव घातला व शहराच्या विविध भागात असलेली पाणीटंचाई व ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेल्या अरेरावीचा पाढाच महापौरांसमोर वाचण्यात आला. विकास ठाकरे म्हणाले, ओसीडब्ल्यू कंपनी शहरात २४ तास पाणीपुरवठा करणार होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना वापरापुरतेही पाणी मिळेनासे झाले आहे. शहराला दररोज ७५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. याचे नियोजन केले सर्व भागांना पुरेसे पाणी मिळू शकते.
पण काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. बहुतांश फ्लॅट स्कीममध्ये नळाद्वारे पाणीच चढत नाही. जलवाहिनी असलेल्या भागात पाणीपुरवठा होत नसेल तर त्या भागात नि:शुल्क टँकर देण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूची आहे. मात्र, ओसीडब्ल्यू नागरिकांकडून टँकरचे पैसे घेत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून टँकरच्या माध्यमातून वसुली करण्याचा गोरखधंदा सुरू आहे.
पाणी मिळत नसलेल्या भागातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला तर ओसीडब्ल्यूचे अधिकारी लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देतात. महापालिकेत भाजप सत्तेत असली तरी ओसीडब्ल्यूने भाजप नगरसेवकांवरही गुन्हे दाखल करण्याचे धाडस केले आहे. महिलांनी तक्रार केली तर त्यांच्याशी ते उद्धटपणे बोलतात. असे असतानाही महापालिकेचे पदाधिकारी ओसीडब्ल्यूच्या विरोधात एक शब्दही बोलायला तयार नाहीत. ओसीडब्ल्यूच्या मालकाशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे हितसंबंध असल्यामुळे पदाधिकारी गप्प आहेत का, असा सवालही ठाकरे यांनी केला. यावर महापौर दटके यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूला दिले जातील, असे आश्वस्त केले.
आंदोलनात नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, डॉ. प्रशांत चोपडा, भावना लोणारे, अरुण डवरे, पुष्पा निमजे, तनवीर अहमद, उमाकांत अग्निहोत्री यांच्यासह काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)