नागपूरच्या दीक्षाभूमीवरून कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:18 AM2019-01-10T11:18:46+5:302019-01-10T11:48:28+5:30
प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. येथील दीक्षाभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. येथील दीक्षाभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, राजेंद्र मुळक, नसीम खान, विलास मुत्तेमवार, अनिस अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.
सवर्णांच्या आरक्षणाने सरकारला फारसा फायदा होणार नाही. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन जुमलेबाजी सुरू आहे : पृथ्वीराज चव्हाण
तीन राज्यात पराभव झाला नसेल तर सरकारने जीएसटी तसेच आरक्षणाचा निर्णय घेतला नसता. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन असे निर्णय घेतले जात आहेत. मात्र मागील साडेचार वर्षात जनता, शेतकरी, व्यापारी यांची अधोगतीच झाली आहे :
राधाकृष्ण विखे पाटील .
जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे उत्साहात पूर्ण झाले आहेत. गुरुवारी सकाळी १० वा. दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरू होईल. दुपारी १२ वाजता कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून दुपारी २.३० रामटेक येथे पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर तुमसर (जि. भंडारा) येथे यात्रेचे स्वागत होईल. सायंकाळी ६ वा. तिरोडा येथे जाहीर सभा होईल.
शुक्रवारी गोंदिया, सडक अजुर्नी, साकोली येथे यात्रा पोहोचेल. १२ जानेवारी रोजी भंडारा, चिमूर येथे सभा होईल. यानंतर वरोरा येथे यात्रा पोहोचेल. सायंकाळी चंद्रपूर येथे रॅली व जाहीर सभा होणार आहे. रविवार, १३ जानेवारी रोजी गडचिरोली, ब्रम्हपुरी येथे यात्रा येऊन पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे होईल. या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
नेते, कार्यकर्ते सज्ज
नागपुरातील सद्भावना लॉन, पोलीस लाईन टाकळी येथे जनसंघर्ष यांत्रेचा समारोपीय सभेच्या तयारीसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात आढावा बैठक घेण्यात आली. ब्लॉक अध्यक्षांना व पदाधिकारी यांना विविध जबाबदारीचे वाटप करण्यात आले. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाकरिता किमान तीन हजार लोकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.