काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव
By कमलेश वानखेडे | Published: March 27, 2024 06:16 PM2024-03-27T18:16:36+5:302024-03-27T18:17:01+5:30
रश्मी यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकांवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले असून त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते व हजारो समर्थकांसह रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरून रस्सीखेच सुरू असल्याने भविष्यात कुठलाही धोका नको म्हणून काँग्रेसने सावध पाऊल टाकले आहे. रश्मी यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकांवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले असून त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रश्मी बर्वे यांच्या समर्थनार्थ बिशप कॉटन मैदान येथून भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅलीत माजी मंत्री सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, शिवसेना (उबाठा) चे नेते प्रकाश जाधव, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, विशाल बरबटे, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे, राजकुमार कुसुंबे, प्रवीण जोध, चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, सुनिता गावंडे, शांता कुमरे, भारती पाटील, उज्वला बोढारे, अनुजा केदार, दुधराम सव्वालाखे, नरेंद्र जिचकार, प्रकाश वसू, श्यामकुमार बर्वे, बाबा कोढे, अविनाश गोतमारे यांच्यासह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सेंट उर्सुला शाळेसमोरील रस्त्यावर जाहीर सभा घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सभेत भाजपवर भगोडे उमेदवार उभे केले जात असल्याची टीका केली. उमरेडमध्ये कुणाची ताकद आहे, हे दिसेलच असे सांगत त्यांनी आव्हान दिले. शिवसेनेचे (उबाठा) प्रकाश जाधव यांनी गद्दारांना धडा शिकविण्याची शपथ घेऊन कामाला लागण्याचे आवाहन केले.
आजच्या छाणणीकडे लक्ष, काय होणार ?
- रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातही एक याचिका दाखल आहे. अर्जाच्या छाणनीत जात वैधता प्रमाणपत्रावरील आक्षेप विचारात घेत उमेदवारी अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव एबी फॉर्ववर दुसऱ्या क्रमांकावर टाकण्यात आले आहे. तसेच श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्जही सादर केला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाणणी आहे. यात काही होईल का, रश्मी बर्वे यांना अर्ज स्वीकारला जाईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मला रोखण्यासाठी कट रचला जात आहे : रश्मी बर्वे
- मी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. त्यावेळी कुणीही माझ्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला नाही. मी लोकसभेची उमेदवार होणार हे लक्षात येताच विरोधकांकडून मला रोखण्यासाठी कट रचला जात आहे. न्यायालयाने माझ्या विरोधात दाखल झालेली याचिका २६ मार्च रोजी खारीज केली होती. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. गरीब, शेतकरी व सामान्य माणूस माझ्या पाठिशी उभा आहे. मी दबावापुढे झुकणार नाही तर खंबीरपणे या आव्हानांचा सामना करील व सत्याचाच विजय होईल, असे मत रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केले.