महाठग अजित पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 06:20 PM2023-01-13T18:20:18+5:302023-01-13T18:21:00+5:30
सत्र न्यायालयाचा निर्णय : कोतवाली, अंबाझरीत गुन्हे दाखल
नागपूर : उपराजधानीतील महाठग अजित पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे पारसेला जोरदार दणका बसला आहे. सत्र न्यायालयाचे न्या. जी. पी. देशमुख यांनी हा निर्णय दिला.
अजित पारसेने डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालयासाठी पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली ४ कोटी ३६ लाख ५० हजार रुपयांनी गंडवले आहे. या प्रकरणात पारसेविरुद्ध कोतवाली पोलिसांनी भादंवितील कलम ३८४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
परंतु, पोलिस त्याला तातडीने अटक करू शकले नाहीत. तो आजारपणामुळे बरेच दिवस रुग्णालयात भरती होता. दरम्यान, त्याने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. याशिवाय, त्याने वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांची कोट्यवधी रुपयांचा सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी १८ लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. या प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पारसेच्या घरी राजमुद्रा असलेले शिक्के, पोलिस, बँक व आयकर विभागाचे शिक्के इत्यादी आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. अभय जिकार यांनी कामकाज पाहिले.