कोरोनाच्या दडपणात गायनाने फुलवले चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:39 PM2020-05-27T19:39:28+5:302020-05-27T19:40:51+5:30
सध्या सर्वत्र कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. हा प्रकोप कधी संपेल आणि पुन्हा जग पूर्वपदावर कसे येईल, याचीच चिंता दिसून येत आहे. अशात नागरिकांच्या मनावरील हे दडपण थोडे का होईना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहे. त्याच उपक्रमात वाठोडा येथील गोपाळकृष्णनगर येथे ‘मनोरंजन आपल्या दारी’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या सर्वत्र कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. हा प्रकोप कधी संपेल आणि पुन्हा जग पूर्वपदावर कसे येईल, याचीच चिंता दिसून येत आहे. अशात नागरिकांच्या मनावरील हे दडपण थोडे का होईना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहे. त्याच उपक्रमात वाठोडा येथील गोपाळकृष्णनगर येथे ‘मनोरंजन आपल्या दारी’ हा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.
शीतला माता मंदिर ट्रस्ट व नागपूर वाहतूक पोलिसांच्या वतीने हा कार्यक्रम गोपाळकृष्णनगर येथील शीतला माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला. यावेळी गायकांनी ‘देश मेरा रंगीला’, ‘सुनो गौर से दुनिया वालों...’ अशी विविध गाणी सादर करत गेली दोन महिने दडपणाखाली असणाऱ्या नागरिकांच्या मनात चैतन्य फुलविण्याचे कार्य केले. यावेळी नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावी या हेतूने विशिष्ट अंतरावर गोल पाडून आसनव्यवस्था करण्यात आली होती. सोबतच कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालूनच सहभागी होण्याचे बंधनही होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी सगळे दंडक पाळत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मंदिर ट्रस्टचे मदन अडकिने, हरीश जाचक, पवन खराबे, गोलू गौर यांनी गायक व पोलिसांचे स्वागत केले.