कोव्हॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरही लिहून घेतले जात आहे संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:11+5:302021-03-09T04:08:11+5:30

नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के असल्याचे चाचणीच्या निष्कर्षातून समोर ...

Consent letter is being written even after proving the effectiveness of covacin | कोव्हॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरही लिहून घेतले जात आहे संमतीपत्र

कोव्हॅक्सिनची कार्यक्षमता सिद्ध झाल्यानंतरही लिहून घेतले जात आहे संमतीपत्र

Next

नागपूर : कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. लसीची कार्यक्षमता जवळपास ८१ टक्के असल्याचे चाचणीच्या निष्कर्षातून समोर आली आहे. असे असतानाही कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांकडून तीन पानाचे संमतीपत्र लिहून घेतले जात आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये असमंजस्याची भावना आहे. काही लाभार्थी यासंदर्भात केंद्रावरील अधिकाऱ्यांशी वाद घालतानाही दिसून येत आहेत.

हैदराबादच्या भारत बायोटेक आणि इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हॅक्सिन’ लसीची निर्मिती केली जात आहे. कोव्हॅक्सिन चाचणीचे दोन टप्पे पूर्ण झाले असताना व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू असताना या लसीच्या आपात्कालीन वापराला केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलने मंजुरी दिली होती. यावरून वादाला तोंड फुटले होते. लस प्रभावी आहे का, लसीची कार्यक्षमता काय, याबद्दलची ठोस माहिती समोर आली नसताना व लस क्लिनिकल ट्रायलमध्येच असताना वापराला परवानगी देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर ‘सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी’ने ही लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे, लस सुरक्षित व कार्यक्षम आढळून आल्याचे म्हटले होते. १७ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. नागपुरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) केंद्रावर कोव्हॅक्सिन तर इतर केंद्रावर ‘कोविशिल्ड’ दिली जात आहे. कोव्हॅक्सिन लस देण्यापूर्वी ‘स्क्रिनिंग आणि संमती’ अर्ज भरून घेतला जात आहे. यात या लसीचे फायदे व जोखीम समजल्याचे लाभार्थ्यांकडून लिहून घेतले जात आहे. मात्र मागील आठवड्यात भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन त्याचे निष्कर्ष सादर केले. यात जवळपास ८१ टक्के लस प्रभावी असल्याचे सांगितले. यासंदर्भातील अहवाल लवकरच केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरलकडे सादर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परंतु आता पाच दिवस होऊनही संमतीपत्र न घेण्याबाबत कुठल्याही सूचना कोव्हॅक्सिन केंद्राना प्राप्त झाल्या नाहीत. ते आजही लाभार्थ्यांकडून संमतीपत्र लिहून घेत आहे. परिणामी, याला घेऊन लाभार्थ्यांच्या नाना प्रश्नाला केंद्रातील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

-संमतीपत्र न घेण्याच्या सूचना नाहीत

कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. लसीच्या कार्यक्षमतेचा अहवाल सादर करण्यात आला आहे. परंतु लसीकरण केंद्राला अद्यापही लाभार्थ्यांकडून संमतीपत्र न घेण्याच्या कुठल्याही सूचना नाहीत. यामुळे आम्ही ते घेत आहोत. सूचना आल्यावरच संमतीपत्र घेणे बंद केले जाईल.

- डॉ. उदय नार्लावार

लसीकरण केंद्र प्रमुख, मेडिकल

Web Title: Consent letter is being written even after proving the effectiveness of covacin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.