सक्करदरा तलावाचे संवर्धन चार महिन्यापासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:28+5:302021-08-19T04:09:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण नागपुरातील भोसलेकालीन वैभव असलेल्या सक्करदरा तलाव संवर्धनाचे काम निधीअभावी मागील चार महिन्यापासून ठप्प ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपुरातील भोसलेकालीन वैभव असलेल्या सक्करदरा तलाव संवर्धनाचे काम निधीअभावी मागील चार महिन्यापासून ठप्प आहे.
सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास कार्यासाठी महापालिकेला २४ कोटी रुपये खर्चाची परवानगी राज्य सरकारकडून प्राप्त झाली आहे. याअंतर्गत १० कोटींचा प्रस्ताव मंजूर करून दोन वर्षापूर्वी ८.३५ कोटींचे कार्यादेश देण्यात आले. कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत फक्त ३.५० कोटीचे काम पूर्ण झाले आहे. यात झोपडपट्टीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.
छोटा ताजबागच्या बाजूने तलावाची भिंत नादुरस्त झाली आहे. भिंतीचे काम सुरू करण्यात आले. पायाभरणी सुरू असताना काम ठप्प पडले. पावसाळ्यात तलावात पाणी जमा झाल्यानंतर या बाजूचा रस्त्ता कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची शक्यता आहे. काम बंद असूनही मनपातील पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
.....
तलावाच्या पायऱ्यांना धोका
तलावालगतच्या नासुप्र उद्यानाच्या बाजूने बांधकाम करण्यात आलेल्या पायऱ्या खचायला लागल्या आहेत. याची वेळीच दुरुस्ती न केल्यास तलावात पाणी जमा झाल्यानंतर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
...
पदाधिकाऱ्यांचे नुसते निर्देश
सक्करदरा तलाव हा नागपूरचे वैभव आहे. या पुरातत्त्व वास्तूचे संरक्षण करीत तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याचे निर्देश बैठकीत पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिले. मात्र निधी उपलब्ध करून काम करण्याचे निर्देश दिलेले नाही.
...
हेरिटेज वस्तू नियमानुसार विकास व्हावा
पायऱ्यांचे बांधकाम करताना जुन्या प्रकारचा दगड वापरण्याची गरज आहे. तलावालगतच्या मंदिराचासुद्धा हेरिटेज वस्तू नियमानुसार विकास होणे अपेक्षित आहे.
....
तलावाचा परिसर ७.८० हेक्टर
सक्करदरा तलावाचा संपूर्ण परिसर ७.८० हेक्टर असून, तलाव ३.६८ हेक्टर भागामध्ये आहे. मनपातर्फे लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान, ॲम्पी थिएटर, फूड कोर्ट, उद्यानाचा विकास आणि तलावाच्या दुसरीकडे असलेल्या जागेवर उद्यानाचा विकास प्रस्तावित आहे. जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी तलावाचा विकास करीत आहे.