हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:58+5:302021-09-18T04:08:58+5:30

नागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण व्हावे, याकरिता निश्चय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई ...

Conserve Heritage Sakkarada Lake | हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन करा

हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन करा

googlenewsNext

नागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण व्हावे, याकरिता निश्चय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज्याचे नगरविकासमंत्री, नगर विकास विभागाचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व कंत्राटदार जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

चार एकर परिसरात पसरलेल्या हेरिटेज सक्करदरा तलावाची सरकार व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. तलावाची संरक्षण भिंत कोसळली आहे. तलावात कचरा व गाळ साचला आहे. परिणामी, पाणी प्रदूषित झाले असून, त्यातील जीव मृत्युमुखी पडत आहेत. पूर्वी नागरिक तलावाजवळ फिरायला जात होते. हा परिसर करमणुकीचे आवडते ठिकाण होते. परंतु, आता तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावाचे संवर्धन, विकास व सौंदर्यीकरण करण्यासाठी तातडीने कृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकार व महानगरपालिकेला आवश्यक निर्देश द्यावेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

----

सरकारने निधी दिला नाही

राज्य सरकारने सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण व विकासकामांसाठी नऊ कोटी ९९ लाख ९५ हजार ९६० रुपये मंजूर केले आहेत. परंतु, ही रक्कम अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील कचरा व गाळ काढणे, सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधणे इत्यादी कामे थांबविण्यात आली आहेत. जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. महानगरपालिकेने ५ जून २०२० रोजी राज्य सरकारला पत्र लिहून मंजूर रक्कम त्वरित देण्याची मागणी केली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. हर्षदर्शन सिरास कामकाज पाहणार आहेत.

Web Title: Conserve Heritage Sakkarada Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.