एसीमुळे लागणाऱ्या आगींवरील प्रतिबंधासाठी विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 07:30 AM2021-04-30T07:30:00+5:302021-04-30T07:30:02+5:30
Nagpur News अलीकडे एअर कंडिशनरमुळे लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रशासन, मनपा आणि विशेषज्ञांची चमू यावर विचारमंथन करीत असून उपाययोजना आखत आहे.
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडे एअर कंडिशनरमुळे लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रशासन, मनपा आणि विशेषज्ञांची चमू यावर विचारमंथन करीत असून उपाययोजना आखत आहे. या आठवडाअखेर यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या नियमांना फायर सेफ्टी ऑडिटमध्ये सामील केले जाणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील एका रुग्णालयाला आग लागली होती. यात दोन मुलांचा जीव गेला होता. भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीमागेही असेच कारण सांगितले जात आहे. विरारमधील एका घटनेचे कारणही एसी हेच होते. नागपुरातील वाडीमध्येही अशाच कारणावरून एका ठिकाणी आग लागली होती. वातावरण थंड करणारे हे उपकरण भविष्यात आग लागण्यास कारणीभूत ठरू नये यासाठी आता हा विषय गंभीरपणे घेतला गेला आहे. सध्या कोरोना रुग्णालये मोठ्या प्रमाणावर उभारली जात असून त्यात एसी व इलेक्ट्रिक कनेक्शन लावले जात आहे. यामुळे हा गंभीर विषय ठरला आहे.
नव्या उपाययोजनांमधील मुद्दे
- पॉवर लोडच्या संतुलनासाठी स्टेबलायजर
- विजेच्या लोडनुसार एसीची निवड
- वायरिंगसाठी उत्तम प्रतींच्या वायरचा वापर
- उन्हाळा सुरू होण्यापूर्वी एसीचे मेन्टेनन्स
- प्लगची वारंवार देखभाल व तपासणी
- दक्ष व अनुभवी मेकॅनिककडूनच गॅस टाकणे
- एसी सिस्टिम असलेल्या ठिकाणी पडदा, लाकडी भिंत नसावी.
...