दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:45 PM2019-08-20T23:45:45+5:302019-08-20T23:50:22+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सरकार जाणीवपूर्वक तपासात विलंब करीत असल्याचा आरोप करीत मंगळवारी महाराष्ट्र अंनिसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. पुरोगामी महाराष्ट्रात मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेला आज सहा वर्षे पूर्ण होऊनही मारेकरी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील विवेकवादाचे पुरस्कर्ते संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. सरकार जाणीवपूर्वक या घटनेच्या तपासात विलंब करीत असल्याचा आरोप करीत मंगळवारी महाराष्ट्र अंनिसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय शेंडे, जिल्हाध्यक्ष जगजित सिंह, कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, प्रधान सचिव गौरव आळणे, रामभाऊ डोंगरे आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाशी राणी चौक ते व्हेरायटी चौकपर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे शंभरावर विद्यार्थी सभासद, हिंगणा शाखेचे सभासद सहभागी झाले होते. तपासातील दिरंगाईवर नाराजी व्यक्त करीत सरकारविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली. चंद्रकांत श्रीखंडे म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या हत्येला सहा वर्षे लोटली, मात्र अद्याप या घटनेतील सूत्रधारापर्यंत पोलीस पोहचू शकले नाही. दाभोलकरांच्यानंतर पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. हा विवेकवादाचाच खून होय. सहा वर्षेपर्यंत मारेकऱ्यांना पकडले जाऊ शकत नाही, ही पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका होय. कर्नाटकमधील तपास यंत्रणांनी तपासात गती घेतली व हत्येच्या कळीपर्यंत पोहचण्यात यश मिळाले. असे असताना महाराष्ट्रातील तपास यंत्रणा मात्र अद्याप मारेकरी व सूत्रधारांपर्यंत पोहचू शकले नाही. या हत्येमागे धर्मांध शक्तींचा सहभाग असल्याने त्यांना वाचविण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक या तपासाची गती वाढविण्यात कुचराई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य शासनाने या हत्येच्या तपासाची गती वाढवावी आणि दाभोलकरांचे मारेकरी व या हत्येमागील सूत्रधारांना पकडून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. झाशी राणी चौकात मोर्चाची सांगता झाली व त्यानंतर हिंदी मोरभवन येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी व विवेकवादाचे पुरस्कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.