वारसदारांना २७ वर्षानंतर दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:22+5:302020-12-28T04:06:22+5:30
नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...
नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना ४ लाख ६२ हजार २५० रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.
पद्मा जोशी असे पत्नीचे तर, धनश्री असे मुलीचे नाव आहे. ते यवतमाळ येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव वीरेंद्र होते. संबंधित अपघात २० एप्रिल १९९३ रोजी घडला. वीरेंद्र यांच्या दुचाकीला यवतमाळ-नागपूर एसटी बसची धडक बसली. त्यामुळे वीरेंद्र गंभीर जखमी होऊन मरण पावले. वीरेंद्र व बस चालक शेख कटरू शेख भारू मुस हे दोघेही वेगात वाहन चालवित होते. अपघात झाल्यानंतर शेख कटरू यांनी ब्रेक लावला असता बस १५ फुटापर्यंत घासत गेली होती. वीरेंद्र यांच्या वारसदारांनी सुरुवातीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात भरपाईचा दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो दावा फेटाळून लावला. परिणामी, वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील अंशत: मंजूर करून सदर आदेश देण्यात आला.