गोव्याला जाणाऱ्या वैदर्भीयांना दिलासा; नागपूर-मडगाव-नागपूरच्या कालावधीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:42 AM2020-12-22T10:42:57+5:302020-12-22T10:43:16+5:30
Nagpur News Train रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीच्या कालावधीत वाढ करून या गाडीच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे गोव्याला जाणाऱ्या वैदर्भीयांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर विशेष साप्ताहिक रेल्वेगाडीच्या कालावधीत वाढ करून या गाडीच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे गोव्याला जाणाऱ्या वैदर्भीयांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०१२३५ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस ८ ते २९ जानेवारीपर्यंत आणि रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६ मडगाव-नागपूर एक्स्प्रेस ९ ते ३० जानेवारीपर्यंत आठवड्यातून एकदा धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०१२३५ नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी ८ ते २९ जानेवारीपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूरवरून दुपारी ४ वाजता सुटेल. ही गाडी वर्धा ४.५३, बडनेरा ६.४८, अकोला ७.४५ आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी मडगावला दुपारी ४.४० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६ मडगाव-नागपूर विशेष रेल्वेगाडी ९ ते ३० जानेवारी या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७.४० वाजता मडगाववरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी अकोला दुपारी ३.५५, बडनेरा ५.१८, वर्धा ६.२८ आणि नागपूरला रात्री ८.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात आरक्षित कोच राहणार असून, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. प्रवासात प्रवाशांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार असून मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रवासाच्या दोन तास आधी प्रवाशांना रेल्वेस्थानकावर यावे लागणार आहे.
.............