अभियांत्रिकी महाविद्यालयांची शिष्यवृत्ती एकत्रित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:48+5:302021-04-01T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अगोदरच कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असताना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये शासकीय हलगर्जीपणामुळे अडचणीत सापडली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगोदरच कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असताना खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये शासकीय हलगर्जीपणामुळे अडचणीत सापडली आहेत. २०२०-२१ च्या शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेसाठी ‘महाडीबीटी पोर्टल’ आठ महिने उशिराने सुरू झाले. त्यामुळे आतापर्यंत महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचा एकही हप्ता मिळालेला नाही. दोन्ही हप्त्याची शिष्यवृत्ती एकत्रित देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नवीन वर्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण ‘ऑनलाईन’ करावे लागते. दरवर्षी जून-जुलै महिन्यातच ‘महाडीबीटी’चे संकेतस्थळ खुले केले जाते. जानेवारी महिन्यात शिष्यवृत्तीच पहिला हफ्ता व एप्रिल-मेमध्ये दुसरा हप्ता महाविद्यालयांना मिळायचा. मात्र यंदा फार उशीर झाला व फेब्रुवारीमध्ये संकेतस्थळ खुले झाले. प्रत्यक्ष शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळायला आणखी जास्त कालावधी शकतो. यामुळे महाविद्यालयांची अडचण आणखी वाढू शकते. ही बाब लक्षात घेता महाविद्यालयांचे दोन्ही हप्ते एकत्रच देण्यात यावे, अशी मागणी ‘विदर्भ अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’तर्फे करण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये चिंता
यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनांकडून सातत्याने शासनाकडे निवेदन करण्यात येत आहेत. मात्र अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याने अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन, आर्किटेक्चर, फार्मसी इत्यादी महाविद्यालयांसमोर संकट उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन वर्ग सुरू असून खर्चाचा बोजा वाढत असल्याचे चित्र असल्याची माहिती ‘विदर्भ अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेज मॅनेजमेन्ट असोसिएशन’चे महासचिव अविनाश दोरसटवार यांनी केली.