‘संथारा’च्या समर्थनार्थ एकजूट

By admin | Published: August 25, 2015 04:07 AM2015-08-25T04:07:41+5:302015-08-25T04:07:41+5:30

संपूर्ण जैन समाजासाठी श्रद्धा, सन्मानाची बाब असलेल्या श्रेष्ठ मृत्यू अवस्था ‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाने

Consolidate in support of 'Santhara' | ‘संथारा’च्या समर्थनार्थ एकजूट

‘संथारा’च्या समर्थनार्थ एकजूट

Next

नागपूर : संपूर्ण जैन समाजासाठी श्रद्धा, सन्मानाची बाब असलेल्या श्रेष्ठ मृत्यू अवस्था ‘संथारा’च्या समर्थनार्थ जैन समाजाने विशाल रॅली काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राचीन काळापासून चालत आलेल्या जैन समाजातील ‘संथारा’ या प्रथेला अवैध ठरविण्याच्या राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाचा जैन समाजाकडून विरोध करण्यात आला. श्री जैन सेवा मंडळ व श्री सकल जैन समाजाच्या आवाहनावर सोमवारी विशाल रॅली काढण्यात आली व सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन धर्माच्या सर्व पंथांच्या अभूतपूर्व एकतेचे दर्शन घडले. मुस्लीम व हिंदू संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सभास्थळी येऊन जैन धर्मीयांच्या भूमिकेचे समर्थन केले. या सभेनंतर राष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सोपविण्यात आले.

सोमवारी दुपारी १.३० वाजता इतवारी येथील गांधी पुतळा चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. यात दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी, नागदा, खंडेलवार इत्यादी सर्व पंथांचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पुरुषांनी शांतीचे प्रतीक असलेले श्वेतवस्त्र तर महिलांनी पिवळे वस्त्र घातले होते. अनेकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळी पट्टी बांधली होती. नागरिकांनी हातात विविध फलक घेतले होते. यात ‘संथारा’, जैन एकता, जैन धर्माचे महत्त्व इत्यादींबाबत घोषणा लिहिल्या होत्या. सेंट्रल एव्हेन्यूमार्गे ही रॅली जवळपास २.३० वाजता कस्तुरचंद पार्क येथील सभास्थानी पोहोचली. यावेळी जैन संत पूर्णचंद्र सूरीश्वरजी महाराज, दिगंबर संत मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, गिरनारसागरजी महाराज, पीयूषसागरजी महाराज, रविपद्मनंदीजी महाराज, जैन साध्वी प्रफुल्लाजी, इतर साध्वी यांच्यासमवेत सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती उपस्थित होते.

समाजशक्ती दिसून आली
सभेच्या सुरुवातीला श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता यांनी प्रस्तावना मांडली. जैन समाजाने ‘संथारा’च्या मुद्यावर जी एकजूट दाखविली आहे त्यामुळे संपूर्ण देशात एक संदेश गेला आहे. जैन समाजातील नागरिकांची संख्या कमी असली तरी, या समाजाचे विचार फार मोठे व महान आहेत. ज्या संतांच्या आज्ञेचे पालन करून समाज समोर मार्गक्रमण करतो, त्यांच्याच मार्गदर्शनात आज समाजातील सर्व पंथ एकत्र झाले आहेत. या एकतेचे स्वागत आहे, असे प्रतिपादन मेहता यांनी केले.

न्याय मिळेपर्यंत एकजूट दाखवावी लागेल
न्यायपालिका एक संवैधानिक संस्था आहे. न्यायपालिकेचा आम्ही सन्मान करतो, परंतु ज्यावेळी न्यायपालिका धार्मिक मान्यतांना धक्का पोहोचविते तेव्हा त्याचा विरोध होणे स्वाभाविक आहे. आत्महत्येसारखे कृत्य करेल इतका जैन समाज हा पळपुटा समाज नाही. नक्कीच न्यायालयासमोर तथ्य आणण्यात कमतरता राहिलेली आहे. ‘संथारा’बाबत मी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली, असे प्रतिपादन खा. अजय संचेती यांनी केले. जोपर्यंत समाजाच्या हिताचा निर्णय येत नाही तोपर्यंत याचप्रकारे आपल्याला एकजूट दाखवावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

न्याय मिळेपर्यंत उत्साह टिकवून ठेवा
जैन साध्वी प्रफुल्लाजी म.सा. यांनी हा उत्साह टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वांनी एकजूट अशीच कायम ठेवावी, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविले निवेदन
संपूर्ण जैन समाजाकडून शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदा व न्यायमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्री नजमा हेपतुत्ला, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके यांच्या नावे निवेदन सोपविण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खा. विजय दर्डा यांनी केले. शिष्टमंडळात खा. अजय संचेती, श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता, नगरसेवक आभा पांडे, नरेश पाटणी, संतोष पेंढारी, गणेश जैन, सुमत लल्ला जैन, महेंद्र कटारिया, रोहित शाह, रिचा जैन, अतुल कोटेचा, सतीश पेंढारी, संजय टक्कामोरे, रवींद्र आग्रेकर, घनश्याम मेहता, जिनेंद्र लाला, मगनभाई दोशी, जितेंद्र तोरावत, दिनेश सावलकर, अभयकुमार पनवेलकर यांचा समावेश होता.

जैन धर्माच्या भावनांचा सन्मान होईलच
यावेळी श्री सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खा. विजय दर्डा यांनी मार्गदर्शन केले. जैन धर्म भगवान महावीर यांच्या विचारांचा धर्म आहे. आम्ही दया व करुणा यावर विश्वास ठेवतो. आमच्या या भावनेचा सन्मान व्हावा, हीच आमची अपेक्षा असते. जैन समाज संख्येने लहान परंतु विचारांनी फार मोठा समाज आहे. हेच कारण आहे की, भगवान महावीर यांच्याबद्दल जगभरातील ११९ विद्यापीठांमध्ये शिकविण्यात येते. आमचे सर्व तीर्थंकर क्षत्रीय म्हणून जन्माला आले होते आणि करुणा क्षत्रियांनाच शोभते. आम्ही पशुपक्ष्यांबाबत दयाभाव ठेवतो. ‘संथारा’ ती अवस्था आहे ज्याचे पालन प्राचीन काळातील चंद्रगुप्तापासून ते आचार्य विनोबा भावेपर्यंत अनेकांनी केले. आम्हाला भारताचे संविधान व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आज जी एकता दाखविली आहे त्याचा नक्कीच सन्मान होईल. न्यायपालिकेला ‘संथारा’ समजाविताना काही त्रुटी राहिल्या आहेत. जैन समाजातील अनेक लोक मोठे वकील आहेत. ते ‘संथारा’ म्हणजे काय हे देखील जाणतात. त्यामुळे जैन समाजाच्या भावनांचा सन्मान होईल, असा विश्वास असल्याचे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

समाधी मरणासाठी देवाकडे प्रार्थना करा
जैन धर्माचा आधार साधना आहे. साधनेशिवाय सिद्धी मिळूच शकत नाही. अचानक मरण आले तर चांगल्या मृत्यूपासून मनुष्य वंचित होतो, परंतु जिवंत असलेल्यांनी ‘संथारा’ला प्राप्त करणे श्रेष्ठ आहे. समाधी मरण यावे यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हवी. संत व मुनी नेहमी प्रसन्न असतात, मग ‘संथारा’ आत्महत्या होऊच कशी शकते, असे मत आचार्य पूर्णचंद्र सूरीश्वरची महाराज यांनी व्यक्त केले.

‘संथारा’ला समजणे कठीण
‘संथारा’ला नेमके समजणे फार कठीण आहे. याला समजून घेण्यासाठी बुद्धी नव्हे तर मनाची आवश्यकता असते. ‘संथारा’ला मानणारा जैन समाज मूर्खांचा समाज नाही. जीवनभर व्रत, तप केले, पण ‘संथारा’ नाही केला तर सर्व व्यर्थ आहे. ‘संथारा’, संलेखना किंवा समाधी मरण सौभाग्यामुळेच प्राप्त होते, असे प्रतिपादन मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी केले.

परंपरेत स्वेच्छेला स्थान
भारताच्या संविधानात सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जैन धर्मात ‘संथारा’च नव्हे तर केशलोचनसारख्या परंपरा आहेत.
परंतु या सर्वात कोठेही जबरदस्ती नसते तर या स्वेच्छेने करण्यात येतात, अशी माहिती रविपद्मनंदीजी महाराज यांनी दिली.

त्यागातच जीवनाची धन्यता
या जगात मृत्यू येण्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु ज्याने अखेरच्या क्षणात त्याग केला त्याचे जीवन धन्य होते. जे लोक कायदे बनवितात, त्यांनी अगोदर सर्व धर्मांचा अभ्यास करावा, अशी सूचना मुनिश्री गिरनारसागरजी महाराज यांनी दिली.

जैन धर्माची एकता प्रशंसनीय
जर जैन समाजाची तुलना संत्र्यासोबत केली तर याचे सर्व पंथ म्हणजे संत्र्याच्या गोड फोडींप्रमाणे आहेत. महात्मा गांधींनी पुढील जन्मात जैन कुळात जन्म घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. जैन धर्मीयांनी दाखविलेली एकता प्रशंसनीय आहे, असे उद्गार पीयूषसागरजी महाराज यांनी काढले.

जनप्रतिनिधी, इतर समाजांचे समर्थन
सभेच्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ अध्यक्ष हेमंत जांभेकर तसेच ‘आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य अब्दुल वहाब पारेख यांनी आपल्या संस्थांच्या वतीने जैन समाजाच्या आंदोलनाला समर्थन असल्याचे सांगितले. याचप्रमाणे आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, नगरसेवक आभा पांडे यांनीदेखील समर्थन दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इंदरचंद जैन पेटीस व रिचा जैन यांनी केले. संचालन नरेश जैन, सतीश जैन पेंढारी यांनी केले.

Web Title: Consolidate in support of 'Santhara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.