हे तर बहुजनांमध्ये जातीय दंगली घडवण्याचे षड्यंत्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 08:50 PM2018-01-15T20:50:22+5:302018-01-15T20:56:48+5:30
बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून आपला स्वार्थ साधण्याचे काम काही संघटना अनेक वर्षांपासून करीत आहे. कोरेगाव भीमा येथील हल्लाही त्याच मानसिकतेतून करण्यात आलेला होता. परंतु बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजातील जागरुक नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजन समाजात जातीय संघर्ष पेटवून आपली राजकीय पोळी शेकण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. समाज व देशासाठी हे धोकादायक आहे, असे होऊ नये म्हणून नागपुरातील मराठा सेवा संघ, ओबीसी महासंघ आणि बुद्धिस्ट संघटनांनी बहुजन समाजामध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
भाऊसाहेब सुर्वेनगर येथील मराठा सेवा संघाचे मुख्यालय असलेल्या बळीराजा भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती विषद करण्यात आली. या पत्रपरिषदेला मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव मधुकर मेहकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर असोसिएशन (बानाईचे )माजी अध्यक्ष प्रदीप नगरारे, आंबेडकरी विचारवंत अशोक गोडघाटे, प्रा. जैमिनी कडू, डॉ. कृष्णा कांबळे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा जया देशमुख यांनी संबोधित केले.
कोरेगाव भीमामध्ये झालेल्या घटनेनंतर बहुजन समाजाला त्यांचे शत्रू कोण आणि मित्र कोण यांची ओळख झालेली आहे. त्यामुळे बहुजन समाजामधील विविध जातींमध्ये संवाद आणि समन्वय स्थापन करण्यासाठी शहर, तालुका आणि गावांच्या पातळीवर बहुजन समाजाची समन्वय समिती स्थापन केली जाईल. आपसी विसंवादाचे मुद्दे चर्चेद्वारे सोडवण्यात येतील. बहुजन समाजामधील घटकांमध्ये सातत्याने संवाद आणि समन्वय साधला जाईल. त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा अथवा यासारख्या आणखी घटना जर घडल्या त्यावेळी आमची समिती संवाद साधेल, शांतता प्रस्थापित करेल आणि समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या समितीमध्ये बहुजन समाजातील सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असेल. राजकीय पुढाऱ्या ला घेतले जाणार नाही. राज्यभरात प्रत्येक गावात अशी समन्वय समिती स्थापन केली जाईल.
डॉ. अनिल हिरेखण, पी.एस. खोब्रागडे, प्रा. रमेश भिया राठोड, दिलीप खोडके, डॉ. त्रिलोक हजारे आदी उपस्थित होते.
मनोहर भिडे व मिलिंद एकबोटेला त्वरित अटक करा
कोरेगाव भीमा हल्ल्यातील मास्टरमार्इंड मनोहर ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे याला अजूनही अटक झाली नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा वाद भिडे आणि एकबोटे यांनी निर्माण केला. इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये जातीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना अटक होत नाही, हे निंदनीय आहे. त्यांना त्वरित अटक व्हावी. तसेच या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात बौद्ध समाजातील आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. ते तातडीने मागे घ्यावे. त्यांची धरपकड थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.