राजकीय शत्रूंचा माझी बदनामी करण्याचा कट : अशोक धवड यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 09:05 PM2019-10-28T21:05:55+5:302019-10-28T21:06:48+5:30
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपल्याला फसविण्यात आले आहे. राजकीय शत्रू याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. माझी सर्वत्र बदनामी करण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपल्याला फसविण्यात आले आहे. राजकीय शत्रू याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. माझी सर्वत्र बदनामी करण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी केला आहे.
मी फरार असतानाही नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो अशा बातम्या २६ आॅक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आल्या. काहींनी पोलीस आपला शोध घेत आहे व आपल्याला अटक करण्यासाठी वॉरन्ट जारी करण्यात आला आहे असेही लिहिले. वास्तविकता यापेक्षा वेगळी आहे. मी आपल्या घरीच राहात आहे. सर्वांना घराचा पत्ता माहिती आहे. परंतु, बातम्या प्रकाशित करण्यापूर्वी एकानेही घरी येऊन किंवा फोन करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन केले नाही आणि पोलिसांचे मतदेखील जाणून घेतले नाही. त्यामुळे यामागे केवळ माझी व आमदार राऊत यांची बदनामी करण्याचा हेतू होता हे दिसून येते.
मला फरार आरोपी म्हणणे हा सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने मला अटकेपासून संरक्षण दिले आहे. परिणामी, चुकीच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा सल्ला वकिलाने दिला होता. परंतु, न्यायालयात जायचे नसल्यामुळे केवळ सत्य परिस्थिती समाजापुढे यावी ही इच्छा आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असून न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला न्यायालयातून नक्कीच न्याय मिळेल असे धवड यांचे म्हणणे आहे.