गांधी हत्येचे असे रचले षड्यंत्र
By admin | Published: October 16, 2015 03:28 AM2015-10-16T03:28:24+5:302015-10-16T03:28:24+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र कसे रचण्यात आले, यावर महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी हे स्वत: नागपुरात बोलणार आहेत.
तुषार गांधी नागपुरात बोलणार : युवा जागर व धनवटे नॅशनल कॉलेजचा पुढाकार
नागपूर : महात्मा गांधी यांच्या हत्येचे षडयंत्र कसे रचण्यात आले, यावर महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी हे स्वत: नागपुरात बोलणार आहेत. युवा जागर व धनवटे नॅशनल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा गांधीच्या हत्येचे षडयंत्र’ या विषयावर तुषार गांधी यांचे व्याख्यान २४ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
युवा जागरचे अध्यक्ष अतुल लोंढे यांनी यासंदर्भात पत्रपरिषदेत माहिती देताना सांगितले की, सध्या देशात असहिष्णुता प्रचंड प्रमाणात वाढीस लागली आहे. धर्मा-धर्मात, जाती-जातीत जाणीवपूर्वक तणाव निर्माण केल्या जात आहे. तसेच काय करावे, काय लिहावे, कुणासाठी लिहावे हेच सांगायचे राहिले आहे. ही एकप्रकारची अघोषित आणिबाणी आहे. यातच दादरी हत्याकांडासारखे प्रकरण तसेच लेखनावर बंदी, साहित्यावर बंदी, भाषणावर बंदी घातली जात आहे. म्हणून गांधी-नेहरू यांच्या विचारांची राष्ट्रउभारणीत कधी नव्हे तेवढी गरज आज निर्माण झाली आहे. पण काही विघातक शक्ती त्यांच्या प्रतिमेचे उच्चाटन करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींचे विचार व त्यांच्या हत्येच्या षडयंत्राचा कट यासंबंधीची खरी बाजू जनतेपुढे यावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)