रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले

By नरेश डोंगरे | Published: October 6, 2023 09:14 PM2023-10-06T21:14:54+5:302023-10-06T21:19:28+5:30

शंका-कुशंकांनी रेल्वे प्रशासन हादरले: शेकडो निष्पाप जिवांना संपविण्याचे कुणाचे षडयंत्र?

conspiracy is brewing to cause a train wreck two conspiracies were foiled in four days | रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले

रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले

googlenewsNext

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात पुन्हा एकदा रेल्वेचा घातपात घडवून शेकडो निष्पाप जिवांशी खेळण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची शंका उपस्थित झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या शंकेला अधोरेखित करणारे दोन मोठे कट सुदैवाने उधळले गेले. मात्र, या कट कारस्थानाबाबत सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात असल्याने रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेसह सर्वच सुरक्षा यंत्रणा आजपासून सुरक्षेचे 'जॉइंट ऑपरेशन' करण्यासाठी कामी लागल्या आहेत. 

देश-विदेशात चर्चेला आलेला ओडिशातील बालासोरचा भयावह रेल्वे अपघात अजूनही ताजाच आहे. २ जून २०२२ ला झालेल्या या अपघातामागे घातपात असल्याची जोरदार चर्चा त्यावेळी केली जात होती. त्याच्या कटू आठवणी ताज्याच असताना २ ऑक्टोबरला राजस्थानमधील जयपूर जवळ वंदे भारत ट्रेनच्या ट्रॅकवर मोठमोठे दगड रचून घातपात घडविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हादरलेल्या रेल्वे प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे तसेच खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या घटनेला अवघे चार दिवस होत नाही तोच आता महाराष्ट्रातील चिंचवड आकूर्डी दरम्यानच्या रेल्वे लाईनवर असाच प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला. विशेष म्हणजे, अर्धा किलोमिटरच्या अंतरात घातपाताचे षडयंत्र रचणाऱ्या समाजकंटकांनी चार ते पाच ठिकाणी गोठलेल्या सिमेंटच्या बॅगसह जागोजाती दगडाचे थर रचल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येत आहे. 'ट्रॅक पेट्रोलिंग' करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने एक भयावह रेल्वे अपघात टळला आहे.

षडयंत्राचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

या घातपाताच्या षडयंत्राचा व्हिडीओ रेल्वेच्या देशभरातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रेल्वेत घातपात घडविण्याचा कट शिजत असल्याची जोरदार चर्चाही त्यामुळेच सुरू झाली आहे. अशा प्रकारे घातपात घडवून शेकडो निष्पाप जिवांचा बळी घेणारे समाजकंटक कोण, असा संतापजनक प्रश्न उपस्थित झाला असून त्यातून ते काय साध्य करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

समाजकंटक, दहशतवादी की नक्षलवादी

सणासुदीच्या दिवसांत झालेल्या घातपाताच्या या दोन्ही प्रयत्नांमुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. रेल्वेचा अपघात घडवून शेकडो लोकांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविण्याचे प्रयत्न संबंधित परिसरातील समाजकंटक करीत आहेत की यामागे दहशतवादी किंवा नक्षलवादी आहेत, ते सुद्धा शोधले जात आहे.

जीआरपी, आरपीएफ आणि सिटी पोलिसांचे जॉईंट ऑपरेशन

या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून, रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि राज्यभरातील त्या-त्या ठिकाणच्या पोलिसांकडून (सिटी पोलीस) जॉईंट पेट्रोलिंग केली जात आहे. या प्रकारामागे कोण आहेत, त्याचाही कसून शोध घेतला जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी या संबंधाने बोलताना लोकमतला सांगितले.
 

Web Title: conspiracy is brewing to cause a train wreck two conspiracies were foiled in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.