करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून भारतीयांना कंगाल बनवण्याचे षड़यंत्र पाकिस्तानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:53 AM2018-04-04T09:53:53+5:302018-04-04T10:16:02+5:30

भारतात अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाकिस्तानने आता भारतीयांना लखोपती होण्याचे स्वप्न दाखवत कंगालपती बनविण्याचा घाट घातला आहे.

Conspiracy to make Indians a pauper by showing a dream to make a crorepati | करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून भारतीयांना कंगाल बनवण्याचे षड़यंत्र पाकिस्तानातून

करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून भारतीयांना कंगाल बनवण्याचे षड़यंत्र पाकिस्तानातून

Next
ठळक मुद्देबँक खात्यातील रकमेवर मारतात डल्ला

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात सीमेपलिकडून कधी दहशतवादी घुसवणाऱ्या, कधी बॉम्ब फेकणाऱ्या तर कधी बनावट चलन पाठवून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे कारस्थान रचणाऱ्या पाकिस्तानने आता भारतीयांना लखोपती होण्याचे स्वप्न दाखवत कंगालपती बनविण्याचा घाट घातला आहे. होय, केबीसीच्या माध्यमातून लाखोंची (कुणाला ३५ तर कुणाला २५ लाखांची!) लॉटरी लागली, अशी बतावणी केली जात आहे. संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा हा कट असून तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या सायबर गुन्हेगाराकडून रचला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
लोकमतने या संबंधाने मंगळवारी, ३ एप्रिलला वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. आम्हालाही अशाच प्रकारचे आमिष दाखवण्यात आल्याची माहिती अनेकांनी फोनवरून कळवली. तर, नागपूरच नव्हे तर मुंबईतील तपास यंत्रणांनीही या वृत्ताची दखल घेत हे कटकारस्थान कुठून केले जात आहे, त्यासंबंधाने चौकशी केली असता आमिष दाखवणाऱ्या आरोपीने दिलेला मोबाईल क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे उघड झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन कोट्यवधी भारतीयांची नजर छोट्या पडद्यावर खिळवून ठेवत त्यांना केबीसी (कौन बनेंगा करोडपती)च्या माध्यमातून घरबसल्या करोडपती होण्याचे स्वप्न दाखवतात. सायबर गुन्हेगारांनी केबीसीचा लोगो वापरून अनेकांना लखोपती बनविण्याचे स्वप्न दाखवत कंगालपती करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यानुसार, कौन बनेंगा करोडपतीचे पोस्टर तसेच ३५ आणि २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून ते भारतीयांना कथित विजयकुमार शर्माच्या मोबाईल क्रमांक ००९२३०३७७८३१०० वर फोन करण्यास बाध्य करीत आहेत.
स्वाभाविकपणे एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याचे ऐकून सुखावलेली मंडळी या क्रमांकावर संपर्क करतात अन् नंतर सुरू होतो, त्यांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारण्याचा प्रकार. हे सायबर गुन्हेगार एवढे धूर्त असतात की फोनवर बोलताना ते संबंधित व्यक्तीकडून बेमालूमपणे त्यांच्या बँकेचा खातेक्रमांक किंवा एटीएम कार्डचा नंबर विचारून घेतात अन् संभाषण संपताच संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर बँकेचा संदेश येतो. त्यात खात्यातील विशिष्ट रक्कम कमी झाल्याचे नमूद असते. अशा प्रकारची फसवणूक देशभरात अनेकांच्या वाट्याला आली असून, दररोज अनेक जण कथित लॉटरीची रक्कम मिळवण्याच्या नादात गंडविले जात आहेत. या गैरप्रकाराची माहिती कळताच लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने त्या संबंधाचे वृत्त ३ एप्रिलच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. अनेकांनी लोकमतचे वृत्त व्हायरल केले. लोकमतच्या आॅनलाईन वृत्तसेवेतून या बनवाबनवीची माहिती देश-विदेशात वाचली गेल्याने असंख्य जण सतर्क झाले. दुसरीकडे केबीसीच्या मुंबई कॉल सेंटरमधून बोलतो, अशी बतावणी करणारा कथित राजेशकुमारने दिलेला मोबाईल नंबर पाकिस्तानमधील असल्याचेही उघड झाले. मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ००९२ हा आयएसडी कोड पाकिस्तानचा आहे. त्यामुळे ज्या कथित विजयकुमारच्या मोबाईल क्रमांकावर (००९२ ३०३७७८३१००) तो संपर्क करायला सांगतो. तो क्रमांक पाकिस्तानमध्ये बसलेल्या सायबर गुन्हेगाराचा असल्याचे स्पष्ट होते.

सतर्कता बाळगावी !
विशेष म्हणजे, ही आॅडिओ क्लीप लक्षपूर्वक ऐकल्यास केबीसीकडून बोलणाऱ्या या कथित राजेशकुमारची बोगसबाजी लक्षात येते. तो आधी ज्याचा क्रमांक देतो, त्या विजयकुमार शर्माला तो प्रारंभी कंपनीचा सुपरवायझर असल्याचे सांगतो. त्यानंतर लगेच तो पंजाब नॅशनल बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगतो. दुसरे म्हणजे, सारख्या प्रकारची ईमेज आणि आॅडिओ क्लीप पाठवून कुणाला ३५ लाख तर कुणाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले जात आहे. कुणाला फोन करण्यास सांगितले जात आहे. तर, कुणाला व्हॉटसअ‍ॅप कॉल करायला सांगितले जात आहे. त्यावरून त्याची बनवाबनवी लक्षात यावी. अशा प्रकारचे गुन्हे हाताळणाऱ्या मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या संबंधाने संपर्क केला असता, त्यांनी आपले नाव प्रकाशित करू नका, असे सांगत बोलकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही केबीसीच्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळत नाही, ही बाब लक्षात घ्यायला हवी. कोणताही संपर्क न करता केबीसीची लाखोंच्या रकमेची लॉटरी लागणारच कशी, असा सवालही त्यांनी केला आहे. फसवणूक झाल्यानंतर तक्रार नोंदवून आर्थिक व मानसिक त्रास सहन करण्याऐवजी या आमिषाला बळी न पडता सतर्कता बाळगणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Conspiracy to make Indians a pauper by showing a dream to make a crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा