महापौर जोशी व तिवारींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:05 PM2020-07-14T23:05:05+5:302020-07-14T23:06:49+5:30
महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गृहमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे.
दोन दिवसांअगोदर काही ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बºयाच लोकांच्या मोबाईलवर ही ‘क्लिप’ गेली. या ‘क्लिप’मध्ये दोन अज्ञात व्यक्ती बोलत असून महापौर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून अडचणीत आणण्यासंदर्भात त्यांचे संभाषण आहे. दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी यात दोघांची चर्चा झाली असून मनपातून निलंबित करण्यात आलेल्या डॉ. गंटावार यांचादेखील यात उल्लेख आहे. दोन्ही नेत्यांना अडचणीत आणताना कुठेही समोर यायचे नाही व पडद्यामागे राहूनच हालचाली करायच्या आहेत, अशीदेखील दोघांमध्ये चर्चा झाली. संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी नेमके कोण कटकारस्थान करत आहे, यांचा करविता धनी कोण, इत्यादी प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.
धंतोलीतील ‘ते’ इस्पितळ कुठले
या ‘क्लिप’मध्ये दोन्ही व्यक्ती एका डॉक्टरबाबतदेखील चर्चा करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘आपण अगोदर सरांच्या धंतोली येथील इस्पितळात भेटलो होतो. आपण तेथेच बसून पुढील बैठक करू. त्यांचे आता बैद्यनाथ चौकात नवीन इस्पितळ बनत आहे’, असा यात संवाद आहे. ते नेमके कोणत्या डॉक्टरबाबत बोलत आहेत, हादेखील प्रश्न आहे.
उच्चस्तरीय चौकशी व्हावी
यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या ‘क्लिप’मध्ये भाजपच्या नेत्यांविरोधात ‘हनी ट्रॅप’ करून त्यांना अडकविण्याच्या गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. शिवाय गृहमंत्र्यांचेच नाव घेऊन शहरात गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचे दोन्ही अज्ञात व्यक्ती बोलत आहेत. न्यायव्यवस्थेबाबतदेखील अयोग्य भाषा वापरली आहे. ही बाब गंभीर असून या ‘क्लिप’ची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.