कोरोनामुळे हवालदाराचा मृत्यू; पारडी पोलीस ठाण्यात बजावत होते सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:35 PM2020-08-27T21:35:45+5:302020-08-27T21:35:55+5:30
दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती.
नागपूर : शहर पोलिस दलातील आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे पोलीस दलातील कोरोना बळीची संख्या आता चार वर पोहोचली आहे. सुरेश पाल (वय ५४) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते पारडी पोलीस ठाण्यात सेवारत होते.
दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी हवालदार पाल त्यांच्या ४ सहकार्यांसह घटनास्थळी गेले होते. मृतक तरूण कोरोणा बाधित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर पाल आणि अन्य चौघांना होम क्वारेंटईन करण्यात आले होते. पाल यांची प्रकृती जास्त झाल्यामुळे एक आठवड्यापूर्वी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी पाल यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.
यापूर्वी शहर पोलीस दलातील भगवान शेजुळ, सिद्धार्थ सहारे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि नंतर बुधवारी सुरज पंचभाई नामक पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या एका नातेवाईकाचा ही कोरोनाने बळी घेतला आहे तर सुमारे ४२५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे. दिवसागणिक कोरोना पोलीस दलावरचा विळखा घट्ट करत असल्याने शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.