संविधान लोकांना जोडते, मनुस्मृती विभाजन करते - चंद्रशेखर आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 08:15 PM2020-02-22T20:15:29+5:302020-02-22T20:25:07+5:30
स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी केली.
नागपूर : आपला देश संविधानावर चालतो. संविधानामुळेच देशाची एकता व अखंडता टिकून आहे. सर्वधर्मसमभाव, रोटी, कपडा व मकान तसेच सर्वांना संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण स्वतंत्र भारतात सर्वात मोठे आंदोलन सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू आहे. मनुस्मृती अन् संविधान असा हा संघर्ष आहे. मात्र संविधानाची शक्ती मोठी आहे. संविधान लोकांना जोडते तर मनुस्मृती विभाजन करते. , अशी टीका भीम आर्मींचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी शनिवारी भीम आर्मीतर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित संविधानिक संमेलन व कार्यकर्ता मेळाव्यात केली.
सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली मुस्लीम, दलित व आदिवासींना दुय्यम नागरिक त्व देण्याचा छुपा अजेंडा राबवून त्यांचे नागरिक त्व हिरावण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. या कायद्याला आमचा विरोध आहे. या कायद्याच्या विरोधात २३ फेब्रुवारीला भारत बंद ची घोषणा आझाद यांनी केली. मंचावर समीर अहमद विद्रोही, मलकीतसिंग बल, अशोक कांबळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, शहर अध्यक्ष मुकेश खडतकर, मनोज मून, वीरा साथीदार, मनीष साठे आदी उपस्थित होते.
नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. मात्र, उच्च न्यायालयाने भीम आर्मीला काही अटी घालत मेळाव्याला परवानगी दिली होती. यावर आझाद म्हणाले, हा देश आमचा आहे. सरकारने अडचणी आणल्या तरी न्यायालयाची शक्ती मोठी आहे. त्याहून मोठी शक्ती या देशातील नागरिक आहेत. तिरंगा हा माझा जीव आहे. याचा अपमान सहन करणार नाही. या मैदानावर प्रथमच झेंडा फडकावत आहे, असे म्हणत आझाद यांनी हातातील तिरंगा झेंडा उंचावला.
हा देश भगवान गौतम बुद्ध, फु ले, शाहू , आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या समता व बंधूभावाच्या विचारावर चालतो. देशावर अनेकदा हल्ले झाले. इंग्रजांनाही वाटले होते की आपण भारतावर राज्य करू. पण जनआंदोलनामुळे त्यांना जावे लागले. आजही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुस्मृतीला मानणाऱ्या संघाच्या विचारावरच केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. जयभीमचा नारा महाराष्ट्राने दिला. आज तो जगभरात घुमत आहे. जेव्हा संसदेत बहुमत राहात नाही अशावेळी रस्त्यावर उतरून संघर्ष करावयाचा असतो. आम्हाला पंतप्रधानांचा सन्मान राखण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यांनीही देशातील नागरिक व संविधानाचा सन्मान करावा. सीएए आणि एनआरसी कायदा लोकांना नको आहे. तो त्यांनी परत घ्यावा, अशी मागणी आझाद यांनी केली.
हक्काच्या गोष्टीसाठी विरोध करतोय पण सभा घेऊ देत नाही. आम्ही देश वाचविण्यासाठी कफन बांधले आहे. प्रसंगी बलिदान देऊ , गुलामीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात जगणे कधीही चांगले. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचेही ते म्हणाले.
समीर अहमद विद्रोही म्हणाले, स्वातंत्र्य व गुलामी एकत्र राहू शकत नाही. राज्यकर्ते मताचा विचार करतात. आम्ही पुढच्या पिढीचा करतो. सीएए आणि एनआरसीच्या नावाखाली धर्माच्या आधावर विभाजन के ले जात आहे. आम्ही हा कायदा मानणार नाही.
नागेश चौधरी यांनी सीएए आणि एनआरसी हा संघाचा अजेंडा असल्याची टीका केली. मलकीतसिंग बल, अशोक कांबळे यांनीही सीएए व एनआरसीला विरोध केला.
संघावर बंदी आणली तरच मनुवाद संपेल
सरकारे बदलतात पण विचार बदलत नाही. आम्ही संविधानाला मानतो. संघ मनुवाद मानतो. संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात. मग संघ मुख्यालयावर तिरंगा का नाही. असा सवाल करून राष्ट्रीय स्वयसेवक संघावर बंदी घालावी. अशी मागणी आझाद यांनी केली. संघ प्रमुखांनी भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनुवादाचा अजेंडा न राबविता थेट निवडणूक लढवावी. संघ प्रमुखांनी खुली चर्चा करावी, असे आव्हान देत नागपूर ही दीक्षाभूमी असल्याचे त्यांनी सांगितले.