नागपुरात साकारणार ‘संविधान प्रास्ताविका पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:56 AM2019-11-22T10:56:33+5:302019-11-22T10:57:46+5:30
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’ उभारण्यात येत आहे. देशातील या प्रकारचा हा पहिलाच पार्क असून यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला, हे विशेष.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधानापैकी एक मानले जाते. या संविधानाची ओळख सर्वसाधारणांना व्हावी, त्याची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’ उभारण्यात येत आहे. देशातील या प्रकारचा हा पहिलाच पार्क असून यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला, हे विशेष.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त विविध विभागांकडून अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. तेव्हा नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, अनिल हिरेखन आदींनी संविधान प्रास्ताविक पार्कची संकल्पना मांडली. तत्कालीन कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांनीही त्याला मंजुरी प्रदान केली.
नागपूर शहरातील विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात येणारा हा भव्यदिव्य असा प्रकल्प आहे. देशातील हा आपल्याप्रकारचा एकमेव प्रकल्प असून तो पूर्ण झाल्यावर नागपूरची एक प्रमुख ओळख ठरणार आहे. या संविधान प्रास्ताविका पार्कमध्ये संविधानाची जी मूूल्ये आहेत ती अधोरेखीत करण्यात येतील. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या ओळखपासून तर संविधानाची एकेक मूल्य या पार्कद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पार्कच्या मधोमध सांची स्तूपाच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार राहील. राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन यांच्या प्रतिकृती राहतील. त्या कशा काम करतात याचे प्रदर्शन ते करतील. एम्पी थिएटर राहील. येथे लोकांना संविधानाची मूल्ये समजावून सांगितली जातील. मोठे एलईडी राहतील. त्यावर संविधानाची मूल्ये अधोरेखित व प्रदर्शित होत राहतील. हा पार्क केवळ विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर नागपूरकर व नागपुरात येणाºया प्रत्येक नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीने एक मार्गदर्शक असे ठरणार आहे.
संविधान प्रास्ताविका पार्क समिती
या पार्कच्या उभारणीसाठी विद्यापीठाने संविधान प्रास्ताविका पार्क समिती गठित केली आहे. डॉ. गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गठित या समितीमध्ये माजी न्यायमूर्ती किशोर रोही, आ. अनिल सोले, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, डॉ. पूरणचंद्र मेश्राम, डॉ. अनिल हिरेखन व डॉ. श्रीकांत कोमावार (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे. या समितीच्या देखरेखेखाली नासुप्रतर्फे हा पार्क उभारण्यात येणार आहे.
अन् मिळाली गती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षी या संविधान प्रास्ताविका पार्कची घोषणा झाली. परंतु निधिअभावी, याचे काम सुरू होत नव्हते. तेव्हा समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी, डॉ. अनिल हिरेखन यांनी निधीसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. सामाजिक न्याय विभागाने २ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला. तेव्हा खºया अर्थाने या पार्कच्या कामाला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यास नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. येत्या २६ नेव्हेंबर रोजी या पार्कच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
या संविधान प्रास्ताविका पार्कच्या मध्यभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा नागपुरातच तयार करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध मूर्तिकार रवी यांनी तो तयार केला आहे. जवळपास साडेसात फुटाचा हा पुतळा राहणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात संविधान असलेला हा पुतळा राहणार आहे.