देश आणि संविधान वाचविण्यासाठी संविधान प्रेमिंनी एकत्र यावे
By गणेश हुड | Published: October 19, 2024 03:21 PM2024-10-19T15:21:30+5:302024-10-19T15:22:53+5:30
योगेंद्र यादव यांचे आवाहन : १५० मतदार संघात राबवणार भारत जोडो अभियान
गणेश हूड / नागपूर
नागपूर : सत्ताधाऱ्यांकडून देशातील संविधान, लोकशाही विचार संपवून हुकूमशाही लादण्याच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागला. परंतु ही लढाई अर्धवट आहे. हरियाणातील निकालाने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशाने देश वाचविण्याचे काम केले. देश आणि संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संविधान प्रेमिंनी एकत्र यावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे संस्थापक व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. नागपूर ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांची भूमी आहे. भारत जोडो अभियान देशभरातील सामाजिक संघटनांचे एक व्यासपीठ आहे.
देशातील हुकूमशाही विरोधात व संविधान वाचविण्यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघापैकी १५० मतदार संघात भारत जोडो अभियान विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी महाविकास आघाडीच्या बाजुने उभे राहील. निवडणुकीतंर राज्यातील भाजप सरकार गेले तरी ही आमची लढाई पुढील २५ ते ३० वर्षे सुरू राहील. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. ही लढाई आपण जिंकल्यास दुसरे प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकेल. असा विश्वास योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. यावेळी भारत जोडो अभियानाचे महराष्ट्र समन्वयक संजय मंगला गोपाल, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, प्रा. सुषमा भड यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची गणना व्हावी
ईव्हीएमचा प्रश्न गंभीर आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने हॅक होवू शकते. फेरफार होवू शकतात. जे सत्तेत असलेले लोक याचा गैरफायदा घेवू शकतात. निवडणूक आयोगाला कणा नाही. ते कोणताही निर्णय घेवू शकतात. देशभरातील विरोधीपक्षांनी व्हीव्हीपॅट मतगणनेची मागणी केली आहे. त्यानुसार मतगणना व्हावी, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
जाननिहाय गणना व्हावी
देशात आरक्षणाची मागणी होत आहे. जात निहाय गणनेतून कुठला समाज आर्थिक व सामाजिकदृष्या मागास आहे. हे यातून स्पष्ट होईल. त्यानुसार आरक्षण देणे शक्य होईल. सविधानातही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण दिले असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.