संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नसून अधिकारांचा दस्ताऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:49 PM2017-11-27T23:49:39+5:302017-11-27T23:58:34+5:30
संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे, समजून घ्यावे, घराघरांमध्ये ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे, समजून घ्यावे, घराघरांमध्ये ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे संविधान चौक येथे संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सोमवारी अॅड. शैलेश नारनवरे हे ‘भारतीय संविधान आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.
अॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमातून संविधान तयार केले. ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर तो या देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीयांसह प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचविण्याचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. शोषित, वंचितांसाठी आरक्षण दिलेले आहे. परंतु आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांचे अधिकार डावलले जात आहेत. तेव्हा आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे व ते समजून घ्यावे, तेव्हा या देशात खºया अर्थाने एक परिपूर्ण नागरिक तयार होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी धम्मसंदेश चमूने संविधान हे पथनाट्य सादर केले.
शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवावे
देशात संविधानाची संस्कृती रुजविण्यासाठी लहान वयापासूनच संविधानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शालेय जीवनापासून संविधान शिकविण्यात यावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही अॅड. शैलेश नारनवरे यांनी व्यक्त केली.
२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात संविधान जलसा होईल. त्यानंतर भारतीय संविधान आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या विषयावर डॉ. पी. एस. चंगोले यांचे मार्गदर्शन होईल.